Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Solapur › बडे थकबाकीदार रडारवर

बडे थकबाकीदार रडारवर

Published On: Feb 27 2018 8:21AM | Last Updated: Feb 26 2018 9:00PM सोलापूर :  प्रतिनिधी

महापालिका मिळकतकर वसुलीसाठी आता 5 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ‘टॉप हंड्रेड’ मिळकतदारांना हे पथक ‘लक्ष्य’ करणार आहे. जप्ती, सील, नळकनेक्शन तोडणे या  ‘रुटीन’ कारवाईबरोबरच हे पथक मालमत्ता लिलावाची यादीही तयार करणार आहे. 

आर्थिक अरिष्टात असलेल्या महापालिकेसमोर कर वसुलीचे मोठे आव्हान आहे. चालू आर्थिक वर्षाच्या मिळकतकराची एकूण 71 टक्के इतकी वसुली झाली आहे, तर मागील अनेक वर्षांच्या थकीत कराचा आकडा 135 कोटी रुपये इतका असून त्यापैकी साडेअकरा कोटींची वसुली झाली आहे. वसुलीची ही टक्केवारी केवळ 9 टक्के इतकी आहे. थकीत मिळकतकर वसुलीसाठी याआधीही मोहीम घेण्यात आली, पण मिळकतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता कटू कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी कर वसुलीसाठी कर्तव्यकठोरपणे वागण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने त्यांनी पावले उचलली आहेत. महापालिकेच्या क्षेत्रात एकूण 32 पेठा आहेत. यापैकी शहर व हद्दवाढ भागासाठी प्रत्येकी 100 कर्मचार्‍यांची कर वसुलीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. आता 5 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके सोमवारपासून कार्यरत झाली आहेत. एका पथकात तीन अधिकारी-कर्मचाारी आहेत. ‘टॉप हंड्रेड’ मिळकतदारांची यादी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मिळकतकराची वसुली का होत नाही हे जाणून घेण्याबरोबरच जप्ती, सीलच्या कारवाईचा अवलंब ही पथके करणार आहेत. एवढेच नव्हे वारंवार सांगूनही प्रतिसाद न देणार्‍या मिळकतदारांच्या मिळकती लिलाव करण्यासंदर्भात यादी तयार करण्याची कामही हे पथक करणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात थकीत वसुलीसाठी आजवर मालमत्ता लिलाव झाल्याचे ऐकीवात नाही, पण आता अशी कठोर कारवाई करण्याचे धाडस महापालिका प्रशासनाने केले आहे. 
एकंदर 5 विशेष पथकांच्या नियुक्तीमुळे कर वसुलीला वेग येण्याची अपेक्षा आहे. ‘मार्च एण्ड’ म्हणजे अजून महिनाभर ही मोहीम चालणार आहे. वसुलीचा इष्टांक पूर्ण न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगाही उचलण्यात येणार आहे.