Thu, Jun 20, 2019 06:59होमपेज › Solapur › सत्ताधारी हतबल; विरोधकांचे भीक मांगो!

सत्ताधारी हतबल; विरोधकांचे भीक मांगो!

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:37PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेत भाजप सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही वॉर्ड विकासासाठी निधी मिळत नसल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी निधीसाठी पालकमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला, तर लवकरच विरोधी पक्ष काँग्रेस वॉर्ड विकास निधीसाठी भीक मांगो आंदोलन करून गांधीगिरी करणार आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि पालकमंत्रीदेखील हतबल असल्याचे सध्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून अपवाद वगळता सलग काँग्रेसची सत्ता होती; परंतु जानेवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपने विजयाचा गुलाल उधळला. अनेक वर्षे विरोधकांमध्ये बसण्याची सवय असलेल्या भाजपला सत्ता चालविता येत नसल्याचा आरोप अनेक वेळा विरोधी पक्षांनी केला असून, भाजपचा कारभार पाहता तो आता नागरिकांनाही खरा वाटू लागलेला आहे. महापालिकेच्या सत्तेत आल्यापासून सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये गट पडून सातत्याने वाद सुरू आहेत. या वादाचे मूळ दोन मंत्री देशमुखांमधील वादच असल्याचेही सर्वश्रुत आहे.
गतवर्षी सत्तेवर आल्यानंतर भाजपने पहिला अर्थसंकल्प मांडण्यास उशीर केला. गतवर्षी नगरसेवकांना बजेट तरतुदीनुसारच वॉर्ड विकास निधी मिळाला नाही. आता पुढील वर्षी लोकसभा  आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असून मतदारांसमोर आपल्या पक्षाला मते मागण्यासाठी नगरसेवकांना जावे लागणार आहे; पण गत आणि यावर्षीदेखील नगरसेवकांना वॉर्ड विकास निधी मिळाला नसल्याने वॉर्डात कामे करता आलेली नसल्याने मतदारांसमोर कोणत्या तोंडाने मते मागण्यासाठी जायचे, असा प्रश्‍न सत्ताधारी नगरसेवकांना पडला आहे.  नुकतेच सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसमोर आपले गार्‍हाणे मांडत वॉर्ड विकास निधी मिळण्यासाठी विनंती केली आहे. पालकमंत्र्यांनीदेखील तातडीने महापालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु गाळे उत्पन्नात मिळणारे वाढीव उत्पन्न मिळण्यात नगरसेवकांनीच खो घातल्याने पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे कारण देत यापूर्वीच प्रशासनाने वॉर्ड विकास निधी देण्याबाबत असमर्थतता व्यक्त केली आहे.

दोन्ही मंत्री देशमुख आणि महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांमधील वाद हा सोलापूरच्या विकासामधील सर्वात मोठा अडथळा आहे. यावर्षीदेखील नगरसेवकांना वॉर्ड विकास निधी मिळण्याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे.

भाजप नगरसेवकांमधील पक्षांतर्गत वाद विकोपास गेला असल्याने सत्ताधारी व प्रशासनात ताळमेळ नसल्याचे अनेक वेळा स्पष्ट झालेले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढेल, असे एकही नियोजन सत्ताधार्‍यांकडे दिसून येत नाही. दुहेरी जलवाहिनीची निविदा अद्याप निघालेली नाही, ड्रेनेजच्या कामाला सुरुवात नाही, मोठा पाणीसाठा असतानाही शहरवासियांना तीन ते चार दिवसाआड आणि अनियमित वेळीच पाणीपुरवठा होतो, शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे,  अशा अनेक समस्या शहरात आहेत.

सत्ताधारी अपयशी : नरोटे

 सत्ताधारी नगरसेवक हतबल आहेत, मग विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दाद कोण देणार, अशी स्थिती आहे. अच्छे दिनचे खोटे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपला महापालिकेचा कारभार चालविण्यात अपयश आले आहे. शहर विकासासाठी पालिकेच्या तिजोरीत पैसे नसणे हेच भाजपचे मोठे अपयश आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना पालकमंत्री न्याय देवू शकत नाहीत. दोन्ही मंत्र्यांमुळे शहराचा विकास रखडलेला आहे. सत्ताधारी नगरसेवकांनाच वॉर्ड विकास निधी मिळत नसल्यामुळे लवकरच विरोधी पक्षातील नगरसेवकांना घेऊन वॉर्ड विकास निधीसाठी भीक मांगो आंदोलन करणार आहे.-चेतन नरोटे, गटनेता काँग्रेस.