Thu, Jul 18, 2019 17:25होमपेज › Solapur › विकासकामांची पाटी ‘कोरी’; सर्वपक्षीय नगरसेवक हैराण 

विकासकामांची पाटी ‘कोरी’; सर्वपक्षीय नगरसेवक हैराण 

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 9:45PMसोलापूर ः  प्रतिनिधी

गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीला वर्ष लोटले. मात्र याकालावधीत केवळ सत्ताधार्‍यांच्या गटबाजीशिवाय दुसरे काही घडलेच नाही. निधी न मिळाल्याच्या तसेच अन्य कारणांमुळे बहुतांशी नगरसेवकांची विकासकामांसंदर्भातील पाटी ‘कोरी’च आहे. यामुळे राजीनाम्याचा इशारा तसेच आंदोलनाची वेळ नगरसेवकांवर आली आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक गतवर्षी झाली. मनपावर वर्षानुवर्षे सत्तारुढ असलेल्या काँग्रेसला पायउतार करण्यात भाजपला यश आल्यानंतर ‘गल्ली ते दिल्ली’मध्ये भाजपचीच सत्ता असल्याने विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली होती. पण सत्ताधार्‍यांमधील गटातटाच्या राजकारणामुळे ही आशा फोल ठरली. बजेट तीन महिने उशिरा झाले. भांडवली कामांचा निधी निम्म्यावर आणण्यात आला. यानंतर एका आयोगाच्या आदेशानुसार विकासकामांना कात्री लागली. अत्यावश्यक कामे करण्याचा फतवा निघाला खरा, पण मक्तेदार काम करण्यास राजी नसल्याने गेल्या वर्षभरात नगरसेवकांना काही अपवाद वगळता एकही विकासकाम करण्याची संधी मिळाली नाही.

विकासकामे तर सोडाच देखभाल-दुरुस्तीची कामेदेखील निधीअभावी न झाल्याने जनता नाखूश आहे. गत निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. कामांअभावी जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने आपण उगीचच नगरसेवक झालो, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच भावनेतून एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी नुकतेच नगरसेवकपदाच्या राजीनाम्याचा इरादा बोलून दाखविला. यावरुन नगरसेवक किती त्रस्त आहेत, याची कल्पना येते.  सत्ताधार्‍यांना नेहमीच कोंडीत पकडणारे बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांना ही संधी सोडायची नाही. गेल्या वर्षभरात निधी न मिळाल्याने विकासकामे करता आली नाहीत, असे कारण सांगत चंदनशिवे यांनी शुक्रवारी बोंबाबोंब आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.

भांडवली  निधीची  पूर्तता झाली नाही. अंदाजपत्रकातील बर्‍याच तरतुदी रद्द करण्यात आल्या. शासन निधीतून काही प्रभागांतच कामे सुरु आहेत. गटबाजीमुळे मनपा सभा वेळेवर सुरु होत नाही. सोयीनुसार मनपा सभेचे कामकाज सुरु असून विकासावर चर्चा होत नाही, अशी विविध कारणे सांगत चंदनशिवे यांनी दिली आहेत. बसपतर्फे23 फेब्रुवारी रोजी मनपा प्रवेशद्वारासमोर सकाळी 11 ते 1 यावेळेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.