Tue, Jul 23, 2019 02:46होमपेज › Solapur › महापालिकेच्या जलवाहिनीतून खासगी विहिरीत पाणी?

महापालिकेच्या जलवाहिनीतून खासगी विहिरीत पाणी?

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 10:58PMसोलापूर ः प्रतिनिधी 

एकीकडे शहरात पाण्याचा ठणठणाट असल्याचे कारण सांगत चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यार्‍या सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जाणूनबुजून जलवाहिनी लीकेज करून शेतकर्‍यांच्या विहिरी भरून दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केला. या जलवाहिनीतून रस्त्यावर वाहत असल्याचा व्हिडीओच त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

औज बंधार्‍यातील जॅकवेलमधून सोरेगाव येथील जलशुद्धीकरणात पाणी आणले जाते व तेथून शुद्धीकरण केलेले पाणी सोलापूर शहरात वितरित केले जाते. मात्र, सोरेगाव  येथील जलशुद्धीकरणापासून अर्धा किलोमीटरवर जलवाहिनीतून रस्त्यावर सोडून दिले गेले आहे. लाखो लीटर पाणी रस्त्यावरून शेतात जात आहे. या रस्त्यावरून काही  खासगी कामानिमित्त जात असलेले नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी पाणी वाहत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ क्‍लिप मोबाईलवर तयार करून ती महापालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केली. याबाबत त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उस्करगे यांना विचारणा केली. त्यांनी ही बाब पाणीपुरवठा अधिकारी दुलंगे यांच्या कानावर घातली. त्यावेळी काही वेळात माहिती घेतो, असे सांगितले. अर्ध्या तासाने नगरसेवक धुत्तरागावकर यांनीच त्यांना पुन्हा फोनवर विचारणा केल्यावर पाणीपुरवठा विभागाची विहीर स्वच्छ करण्यासाठी पाणी रस्त्यावर सोडण्यात आले असल्याचे उत्तर दुलंगे यांनी दिले. मात्र आसपासच्या शेतकर्‍यांच्या शेतातील सात विहिरी भरून घेण्यासाठीच ‘अर्थपूर्ण’रित्या हे पाणी सोडले असल्याच्या काही तक्रारी कानावर आल्या असून त्याबाबत आपण निश्‍चित स्वतंत्र यंत्रणा लावून तपासणी करू, अशी माहिती धुत्तरगावकर यांनी दिली.