Wed, Jul 24, 2019 12:43होमपेज › Solapur › ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्तशिवार’ योजनेसाठी ग्रामस्तरीय समिती

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्तशिवार’ योजनेसाठी ग्रामस्तरीय समिती

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 9:07PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या सनियंत्रणाकरिता गाव स्तरावर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

राज्यातील 250 हेक्टरपर्यंतची सिंचन क्षमता असणार्‍या धरणांमधील गाळ काढणे व तो शेतात वापरणे यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अमंलबजावणीकरिता राज्यस्तर, विभागीय स्तर, जिल्हास्तर व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. याचप्रमाणे गाव स्तरावर या योजनेचे सनियंत्रकरिता ग्राम स्तरावर ग्रामस्तरीय समिती गठीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाच्या मृदु व जलसंधारण विभागाने 6 डिसेंबर 2017 रोजी शासन निर्णय घेऊन  गाव स्तरावर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

या ग्रामस्तरीय समितीमध्ये एकूण सहा सदस्य असणार असून सरपंच हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर संबंधित शाखा अभियंता या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीमध्ये एक ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, तलाठी/ग्रामसेवक हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

या समितीच्या कार्यकक्षाही ठरविण्यात आल्या असून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनमध्ये सहभागी होण्याकरिता शेतकर्‍यांना प्रोत्साहित करणे, शेतकर्‍यांना धरणातील गाळ काढण्याकरिता आवश्यक यंत्रसामुग्री व वाहने माफक दरात उपलब्ध करून देण्यास यंत्र / वाहन मालक, शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधणे, ज्याठिकाणी गाळाच्या उपलब्धतेपेक्षा गाळाची माणगी जास्त आहे अशा ठिकाणी गाळ मागणी करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये समन्वय साधणे आदी  या समितीच्या कार्यकक्षा असणार आहेत. या योजनेसाठी ग्राम स्तरावर समिती गठीत केल्यामुळे या योजनेला चांगलेच बळ मिळणार आहे.