Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Solapur › आईसह दोन मुलांची हत्या; दोन मुली गायब

आईसह दोन मुलांची हत्या; दोन मुली गायब

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 10:04PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर ते मंगळवेढा रोडवरील तिर्‍हेजवळील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळील एका झोपडीमध्ये आई व दोन मुलांचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला, तर दोन मुली गायब झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.

हनमबाई रणछोड जाधव (वय 40), लाखी रणछोड जाधव (20) आणि मपा रणछोड जाधव (17) अशी खून करण्यात आलेल्यांची नावे असून धुना रणछोड जाधव (वय 18) आणि वसन रणछोड जाधव (वय 16) या  दोघी गायब झाल्या आहेत. 

 या घटनेमुळे तिर्‍हे परिसरामध्ये एकच  खळबळ उडाली  असून  याबाबत गुन्हा दाखल  करण्याचे  काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

गेल्या अनेक वर्षांपासून  हनमबाई व तिचे पती रणछोड जाधव हे त्यांच्या पाच मुलांसह सिद्धनाथ साखर कारखान्याजवळील पाझर तलावाशेजारी  राहतात. गुराखी असलेल्या रणछोड  हे दुधाचा व्यवसाय करतात.रणछोड जाधव हे जनावरे आणण्यासाठी गुजरातला गेले आहेत, तर त्यांची पत्नी हनमबाई, मुलगी लाखी, धुना, वसन आणि मुलगा मपा हे घरामध्ये होते. शुक्रवारी दुपारी जाधव यांच्या झोपडीमध्ये हनमबाई व लाखी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करून त्यांच्या मृतदेहावर पांघरून घालून ठेवल्याचे दिसून आले, तर झोपडीच्या बाहेर पलंगावर झोपलेल्या अवस्थेत मपा याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले. गावकर्‍यांना ही बाब दिसून आल्यानंतर याबाबत सोलापूर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.

याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळावरुन माहिती घेतली असता झोपडीमध्ये तिघांचा खून करण्यात आला, तर इतर दोन मुली या गायब असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करून एका व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मरण पावलेल्या तिघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेमागील सर्व शक्यता पोलिस तपासून पाहात असून याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तथापि अनैतिक संबंधातून किंवा चोरीकरण्याच्या कारणावरू हे हत्याकांड घडलेअसावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.