होमपेज › Solapur › सोलापूर : तिर्हे येथील तिहेरी खुनाचा गुंता सुटणार 

सोलापूर : तिर्हे येथील तिहेरी खुनाचा गुंता सुटणार 

Published On: Apr 09 2018 12:59PM | Last Updated: Apr 09 2018 12:59PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर ते मंगळवेढा रोडवरील तिर्‍हे जवळील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ एका झोपडीमध्ये हनमबाई रणछोड जाधव (वय ४०), लाखी रणछोड जाधव (वय २०) आणि मपा रणछोड जाधव (वय१७) यांचा अज्ञातांनी धारदार शस्राने डोक्यावर वार करुन  शुक्रवारी खून केला होता. या घटनेनंतर त्यांच्याच घरातील दोन मुली धुना रणछोड जाधव (वय १८) आणि वसन रणछोड जाधव (वय १६) या बेपत्‍ता झाल्या होत्या.  या बेपत्ता मुलीचा शोध लागला असून त्या दोघीना पुणे ग्रामीणच्या यवत पोलिसानी एस टी बसमधून पुण्याकङे जाताना ताब्यात घेऊन सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. 

या दोन्ही मुली परळी-चिकोडी कर्नाटक या एसटी बसमधून तुळजापूर येथे आल्या. नंतर पुणे येथे जाण्यासाठी तुळजापूर-पुणे एसटी बस क्रमांक (एमएच १० बीटी १०२६) मधून प्रवास करीत होत्या.

सोलापूर तालुका पोलिसांना या मुली तेथील एसटी बस डेपोच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुळजापूर-पुणे एसटी बसमधून प्रवास करीत असलेल्या दिसल्या. यानंतर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चक्रे फिरवीत पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधला. त्यानंतर यवत पोलिसांना संबंधित मुलींची माहिती दिली. यवत पोलीस ठाण्याचे हवालदार एन. बी. सस्ते, पोलीस महेंद्र पवार, दशरथ बनसोडे, गणेश पोटे, प्रशांत कर्णवर, होमगार्ड महिला कर्मचाऱ्यांनी एसटी बसमधून या दोन मुलींना ताब्यात घेतले. त्यानंतर सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने या मुलींना ताब्यात घेऊन सोलापूर ला आणले आहे.

 या तिहेरी हत्याकांडानंतर या मुली बेपत्ता झाल्याचे कारण काय, हे हत्याकांड कोणत्या कारणाने झाले, याचा तपास गुन्हे शाखा करत असून तपासात लवकरच सत्य उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी या दोन्ही मुलीना सोलापुरात आणल्यावर पोलीस अधीक्षक नीलेश प्रभू अप्पर अधीक्षक मिलींद मोहिते उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक विजय कुंभार आदी अधिकारी या मुलीकडे तिहेरी खुनाबाबत तपास करीत आहेत. त्या चौकशीतून खळबळजनक माहिती लागण्याची शक्यता आहे.