Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Solapur › सोलापूर : मोहोळजवळील अपघातात पितापुत्र ठार, चार गंभीर

मोहोळजवळील अपघातात पितापुत्र ठार, ४ गंभीर

Published On: Jan 28 2018 7:59AM | Last Updated: Jan 28 2018 7:59AMमोहोळ : प्रतिनिधी  

तरकारी टेम्पो चालकाचे स्टेअरींग वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पो चालकासह चारजण गंभीर जखमी झाले आहेत..  हा अपघात २७ जानेवारी रोजी रात्री ९ ते ९:३० वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) शिवारात आश्रम शाळेजवळ घडला. दादासाहेब जांबुवंत इंगोले (३५ वय), शिवम दादासाहेब इंगोले (०४) 

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथील दादासाहेब इंगोले व त्यांच्या परिवारातील सदस्य आयशर टेम्पो (क्र. एमएच. १३ / एएक्स ९१२२) मधून तरकारी आणण्यासाठी शनिवारी २७ जानेवारी रोजी खुणेश्वर- नरखेड मार्गे देगाव वा. कडे निघाले होते. रात्री  साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सदर टेम्पो देगाव वा. शिवारातील आश्रम शाळेजवळ असणार्‍या वळणावर टेम्पो चालक सचिन बाळू कोकाटे (रा. कळमण ता. उत्तर सोलापूर) याचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याकडेला पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दादासाहेब जांबुवंत इंगोले आणि शिवम दादासाहेब इंगोले या पितापुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर शुभांगी दादासाहेब इंगोले (वय ३० वर्षे), सई दादासाहेब इंगोले (वय ०७), टेम्पो मालक पवन सज्जन पाटील ( सर्व रा. खुणेश्वर ता. मोहोळ) तसेच टेम्पो चालक सचिन कोकाटे हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. रात्री उशीरापर्यंत मोहोळ पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते. या अपघातामध्ये पितापुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने इंगोले कुटुंबासह खुणेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.