Fri, Mar 22, 2019 05:42
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ‘दहा हजार रुपये दे; नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकवतो’

‘दहा हजार रुपये दे; नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकवतो’

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:22AM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पोलिस अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने मोहोळ पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री घडली असून उपचारासाठी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे याबाबत चर्चा होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक कार्यालयाने या घटनेची कुणालाही माहिती होऊ नये याबाबतची काळजी घेतली असून, रुग्णालयातही पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.परमेश्‍वर किसन गुंड (वय 30, रा. अनगर, ता. मोहोळ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याचे नाव आहे.

परमेश्‍वर गुंड याचे अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यासमोर पत्राशेडमध्ये हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये परमेश्‍वर हा अवैधरित्या दारुची विक्री करीत  असल्यामुळे   मोहोळ   पोलिस   ठाण्याच्या कर्मचार्‍यांकडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर परमेश्‍वर हा सोमवारी त्याची नोटीस घेऊन जाण्यासाठी आला होता. मोहोळ पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी परमेश्‍वर गुंड यास तू मला महिना दहा हजार रुपये दे नाही तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवितो असे म्हटले होते. त्यामुळे परमेश्‍वर गुंड हामानसिक तणावा खाली होता. गुंड याने सोमवारी सायंकाळी मोहोळ पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परमेश्‍वर यास त्रास होऊ लागल्याने त्याचा भाऊ राहुल गुंड यांनी त्यास उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.

परमेश्‍वर गुंड याच्याविरुध्द मोहोळ पोलिस ठाण्यात अवैध दारू विकण्याबाबतचे अनेक गुन्हे दाखल आहेत. परमेश्‍वर याचा भाऊ राहुल याच्याविरुध्दही गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविला आहे.