Sun, Feb 23, 2020 02:42होमपेज › Solapur › आ. रमेश कदमांना विधान परिषदेला मतदानाचा अधिकार

आ. रमेश कदमांना विधान परिषदेला मतदानाचा अधिकार

Published On: Dec 04 2017 7:21PM | Last Updated: Dec 04 2017 7:21PM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

कथीत घोटाळा प्रकरणी जेल मध्ये असणारे राष्ट्रवादीचे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश कदम यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मताधिकार बजावण्यास मुंबई शहर व सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. सोमवारी 04 डिसेंबर रोजी मुंबई शहर सत्र न्यायालय क्रमांक 54 ने त्यांना मताधिकार बजावण्याची परवानगी दिली आहे. अशी माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश भोसले यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे.

येत्या 07 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्या धर्तीवर आमदार रमेश कदम यांनी निवडणुकीत मताधिकार बजावण्याची परवानगी मिळण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने सोमवारी 04 डिसेंबर रोजी सुनावणी होवून त्यांना मताधिकार बजावण्याची परवानगी दिली आहे. यापुर्वी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील मताधिकार बजावण्याची संधी न्यायालयाच्या आदेशान्वये आमदार कदम यांना मिळाली होती. या आदेशाचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना दिलेले आहेत. 

आमदार रमेश कदम हे दोन वर्षांपासुन जेल मध्ये आहेत. तरीही त्यांनी मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी आलेल्या संपुर्ण आमदार निधीचा विनीयोग यशस्वीपणे विकासकामे करत केला आहे. सन 2016 ते 2017 या कालावधीत संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील आमदारांना मागे टाकत विकास निधी खर्च करण्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. सध्या देखील त्यांचे मोहोळ मतदार संघावर लक्ष कायम असून त्यांच्या निधीतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात हायमास्ट दिवे, पक्के रस्ते, पाणी पुरवठा, शैक्षणिक सुविधा व आरोग्य विषयक कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मतदार संघात समावेश असणार्‍या उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना रस्ते व दिवाबत्तीसाठी तब्बल पन्नास लाखांचा निधी दिला आहे.

भाजपला होणार फायदा

आमदार कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसमधुन निवडून आले असले तरी ते पक्षावर नाराज आहेत. तशा नाराजी बाबतचे सुतोवाच त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी प्रसंगी प्रसार माध्यमांसमोर केले होते. यावरुन त्यांनी त्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान केल्याच्या चर्चा संपुर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील ते भाजपाच्या उमेदवारास मतदान करण्याची शक्यता राजकीय जाणकारातुन व्यक्त केली जात आहे.