Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Solapur › अखेर मिनी सिद्धेश्‍वर रेल्वे गदगला पळविली 

अखेर मिनी सिद्धेश्‍वर रेल्वे गदगला पळविली 

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:21PMसोलापूर : प्रतिनिधी

 रेल्वे प्रशासनाने अखेर मिनी सिद्धेश्‍वरचा प्रवास गदगपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 26 ऑक्टोबर 2013 साली फक्त सोलापूरकरांच्या हक्कासाठी सुरु केलेली मिनी सिध्देश्‍वरवर आता गदगच्या प्रवाशांनादेखील 10 टक्के हक्क देण्यात आला आहे.

सिध्देश्‍वर एक्स्प्रेसवरील प्रवाशांची वाढती गर्दी पाहून 26 ऑक्टोबर 2013 साली मिनी सिध्देश्‍वर सुरु करण्यात आली होती. या गाडीच्या उद्घाटनावेळी खुद्द तत्कालिन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी हिरवा झेंडा दाखविला होता. सोलापूरकरांनीदेखील या गाडीला भरभरुन प्रतिसाद दिला होता.

परंतु यापुढे 16 मे 2018 पासून मिनी सिध्देश्‍वर एक्स्प्रेस गदगपर्यंत धावणार असल्याची माहिती गुरुवारी दुपारी सोलापूर मध्य रेल्वे विभागातर्फे जारी करण्यात आली आहे. या एक्स्प्रेस गाडीचे गदगपर्यंत विस्तारीकरण करण्यात येऊ नये यासाठी प्रवासी संघटना व इतर सामाजिक संघटनांनी मंगळवारी रंगपंचमीला विरोध करत हलगी आंदोलन व जनआक्रोश आंदोलन केले होते. सोलापूरच्या प्रवाशांचे हक्क इतरांना देऊ नये ही प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली होती. परंतु या विरोधाला न जुमानता रेल्वे प्रशासनाकडून मिनी सिध्देश्‍वर गदगपर्यंत वाढविण्याचा परिपत्रक काढण्यात आले. परंतु या निर्णयाला विरोध करण्यासाठी मिनी सिध्देश्‍वर एक्स्प्रेस गदगला जाताना गाडी अडवू, असा इशारा सोलापूर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजा जाधव यांनी दिला आहे. 

कर्नाटकमध्ये येत्या काही महिन्यांत  निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याअनुषंगाने मिनी सिध्देश्‍वरला गदगपर्यंत वाढवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप  सोलापूरच्या प्रवासी  संघटना  करत  आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी सोलापूर येथील डीआरएम कार्यालयदेखील गुलबर्गा या जिल्ह्याला हलविण्याच्या हालचाली झाल्या होत्या. भविष्यात पुन्हा त्या हालचालींची पुनरावृत्ती होऊ शकते, अशीही चर्चा करण्यात येऊ लागली आहे. मिनी सिध्देश्‍वर 16 मे 2018 पासून मुंबई ते गदगपर्यंत 11139 या नवीन क्रमांकाने धावेल, तर गाडी क्र. 11140   गदग ते मुंबई (सीएसटी)  दरम्यान 17 मे 2018 पासून धावेल.मिनी सिध्देश्‍वरला गदगपर्यंत जाताना बागलकोट व विजापूर असा थांबा देण्यात आला आहे. यापूर्वी मिनी सिध्देश्‍वर सोलापुरात पोहोचल्यावर आठवड्यातून दोन दिवस सोलापूर-विजापूर-सोलापूर असा प्रवास करत होती. यापुढे ही सेवा रद्द करण्यात आली आहे.