Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Solapur › दूध पंढरी वेटिंगवरच

दूध पंढरी वेटिंगवरच

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:06PM सोलापूर : महेश पांढरे 

लोकमंगल मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीस 10 मेट्रिक टन क्षमता असलेला दुग्ध भुकटी प्रकल्प उभा करण्यासाठी राज्य शासनाच्या दुग्धविकास व पशुसंवर्धन आणि मत्स्यविकास विभागाच्यावतीने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. दूध प्रकल्पाच्या 50 हजार लिटरवरून 1 लाख लिटर दुग्धविकास प्रयोगशाळेच्या विस्तारीकरणासाठीही शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र दूध पंढरी नावाने प्रसिद्ध असलेल्या जिल्हा दूध संघाचा प्रस्ताव मात्र 2012 पासून शासनाकडे पडून आहे. 

सध्या दूध दरावरून बराच गोंधळ सुरू आहे. उत्पादन आणि विक्री यामध्ये समतोल होत नसल्याने अनेक सहकारी आणि खासगी दूध संघाकडे लाखो लिटर दूध शिल्लक राहात आहे. त्यामुळे त्या दुधाची विक्री तत्काळ करण्याचा प्रश्‍न अनेक दूध संघांना भेडसावत आहे. दूध काही दिवसांनंतर खराब होत असल्याने त्याला जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे तत्काळ विक्री करण्यासाठी दुधाचे भाव पाडले जातात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकारी दूध संघांसह अनेक दूध संघ आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने अतिरिक्‍त होणार्‍या दुधापासून पावडर बनविण्यासाठी दुग्ध भुकटी प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाकडे सन 2012 मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्या प्रस्तावाला अद्याप परवानगी मिळालेली नाही.  दुसरीकडे सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीला शासनाने परवानगी दिलेली आहे. 

त्यामुळे यामध्ये राजकारण झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडे दररोज 1 लाख लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होत असतानाही जिल्हा दूध संघाला हा प्रकल्प देण्यात आला नाही. त्यामुळे हा दुग्ध भुकटी प्रकल्प चालविण्यासाठी लोकमंगललाही बाहेरील दूध संघाकडील दूध घ्यावे लागणार आहे.