Sun, Aug 25, 2019 12:36होमपेज › Solapur › ‘म्होरक्या’ चित्रपटाच्या निर्मात्याने केला स्वत:चा घात

‘म्होरक्या’ चित्रपटाच्या निर्मात्याने केला स्वत:चा घात

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 9:16PMसोलापूर : प्रतिनिधी

  खासगी सावकाराकडून घेतलेले  दोन लाख रुपये कधी वीस लाख झाले कळालेच नाही. कर्करोगाने ग्रस्त झालेल्या कल्याण पडाल या चित्रपटनिर्मात्याने शेवटी आपली जीवनयात्राच संपविली. दोन खासगी सावकारांनी तगादा लावून एकाने 11 लाख रुपयांचे गाळे लिहून घेतले, तर एका सावकाराने 9 लाखांच्या कोर्‍या चेकवर सह्या करून घेतल्या. 

‘म्होरक्या’ चित्रपट निर्माता कल्याण पडाल यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी कल्याण पडाल यांनी सोलापूर पोलिस आयुक्त कार्यालयात येऊन खासगी सावकारांविरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. श्रीनिवास संगा (विजय नगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) व संतोष नारायण बसुदे (रा. इंदिरा नगर, सोलापूर) यांच्याकडून प्रत्येकी एक एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. परंतु त्यांच्याकडून त्रास होत असल्याची लेखी तक्रार दिली होती.

लेखी तक्रारीमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार श्रीनिवास संगा यांच्याकडून कल्याण पडाल यांनी जानेवारी 2017 मध्ये 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. संतोष नारायण बसुदे यांच्याकडून सप्टेंबर 2016 मध्ये 1 लाख रुपये घेतले होते. श्रीनिवास संगा यांनी चक्रवाढ व्याज आकारणी करुन 9 लाख रुपयांची मागणी केली.इक्वीटास स्मॉल फायनान्स बँकेचे  पाच लाख व चार लाख रुपयांचे दोन चेक कल्याण पडाल यांच्याकडून सह्या करून घेतले होते. तर संतोष नारायण बसुदे यांनी चक्रवाढ व्याज आकारणी करून जानेवारी 2018 मध्ये 11 लाख रुपये गाळे खरेदीसाठी दिले असल्याचे लिहून घेतले. परंतु हा गाळा कल्याण पडाल यांच्या वडिलांनी घेतला होता.

या दोन्ही खासगी  सावकारांकडून   जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तसेच कर्करोगाने ग्रस्त झालो आहे. भरमसाठ व्याज व औषधोपचाराच्या खर्चाने खचलो आहे. प्रचंड मानसिक त्रास होत  आहे. आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे पत्र 15 मे रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात कल्याण पडाल यांनी दिले होते.शेवटी चित्रपट निर्माता कल्याण यांनी गळफास घेऊन आयुष्य संपविले.त्यांची पत्नी विडी कामगार असून दोन मुली व  एक मुलगा असा परिवार आहे.