होमपेज › Solapur › माझं शेत नांगरायला का येत नाहीस; ट्रॅक्‍टर चालकावरच गोळीबार 

माझं शेत नांगरायला का येत नाहीस; ट्रॅक्‍टर चालकावरच गोळीबार 

Published On: Jun 17 2018 5:17PM | Last Updated: Jun 17 2018 5:27PMबेंबळे (सोलापूर) : सिध्देश्वर शिंदे 

माझ्या शेतात पहिल्यांदा का नांगरायला येत नाहीस म्हणून झालेल्या भांडणाचे पर्यवसन गोळीबारात झाले. यावेळी पिस्तुलाने केलेल्‍या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी ३ च्या सुमारास माढा तालुक्यातील परितेवाडी येथे घडली.

तू माझ्याच शेतात नांगरायला का येत नाहीस असा जाब परितेवाडी ता.माढा येथील पिंटु विष्णु धायगुडे याने ट्रॅक्टरचालक असलेले भिमराव जगदाळे याला विचारला. यावेळी झालेल्‍या बाचाबाचीतून धायगुडे याने आपल्या पिस्तुलातून  एक गोळी झाडली. ती जगदाळे यांच्या हाताला लागली. यानंतर पुन्हा वादावादी झाली. यात आनख्रीन एक गोळी झाडण्यात आली. यामध्ये मात्र ती गोळी पिंटु धायगुडे याचेच वडिल विष्णु धायगुडे यांना लागली. यामध्ये जखमी होउन जमिनीवर कोसळले. या गोळीबारात विष्णु धायगुडे यांच्या कपाळाला गोळी घासून गेल्‍याने त्‍यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जखमी झालेल्या धायगुडेंना अकलुज येथील खाजगी दवाखान्यात नेले असुन, या घटनेची नोंद टेंभुर्णी पोलिस स्टेशन ला करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या घटनेमुळे परिते,परितेवाडी सह परिसरात या खळबळ उडाली आहे.