Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Solapur › महापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

महापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 9:57PMसोलापूर : प्रतिनिधी

महापौरपद सव्वा-सव्वा वर्ष शोभा बनशेट्टी व श्रीकांचना यन्नम यांना विभागून देण्याचा निर्णय माझ्या तसेच संभाजीराव पाटील यांच्यासमक्ष झाला होता. पद्मशाली समाजाला न्याय मिळण्याच्यादृष्टीने या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून महापौरपद बदलाची चर्चा सुरु आहे. गतवर्षी मनपात भाजपची सत्ता आल्यावर महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने रस्सीखेच झाली. घटनेनुसार महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. पण याबाबत समझोता म्हणून शोभा बनशेट्टी व श्रीकांचना यन्नम यांना सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद देण्याचा निर्णय झाला होता. बनशेट्टी यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने यन्नम यांनी ठरल्यानुसार आपल्याला महापौरपद देण्याची मागणी केली आहे, पण महापौर बनशेट्टी यांनी सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद देण्याचा निर्णय झाला नव्हता, असा दावा करीत आपण अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचे सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी महापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगून वादावर तूर्त पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

महापौरपदाबाबत पक्षाने दिलेला निर्णय मान्य करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. पद्मशाली समाजाचे भाजपसाठी योगदान मोठे आहे. त्यामुळे या समाजाला ठरल्यानुसार महापौरपद  देणे आवश्यक आहे. समांतर जलवाहिनी, मलनिस्सारणवाहिनी, उड्डाणपूल, नवीन शासकीय रुग्णालय आदी विषय मार्गी लागण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याची मागणी केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. 

व्यापार्‍यांची होणारी हेळसांड पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो. ही निवडणूक पक्षीय नाही. त्यामुळे भाजपचे काहीजण माझ्याविरोधात असले तरी ते गैर नाही. त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी याकरिता आपण प्रयत्न करणार नाही. या निवडणुकीसाठी आपण पॅनल करणार नाही. गणातूनच निवडणूक लढवू, असेही पालकमंत्र्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल सांगितले.