Sun, Aug 25, 2019 18:59होमपेज › Solapur › माथाडी कामगार संपामुळे उलाढाल ठप्प 

माथाडी कामगार संपामुळे उलाढाल ठप्प 

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:55PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राज्य माथाडी हमाल कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत संप पुकारण्यात आला. या संपात कामगार सहभागी झाल्याने येथील सुमारे 7 कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, बाजार समितीचे सचिव मोहनराव निंबाळकर यांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी निवेदन दिले. 
राज्य शासनाने राज्यातील 36 माथाडी महामंडळाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हमाल माथाडी कामगारांची गैरसोय होणार असल्याने या निर्णयाविरोधात राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या वतीने मंगळवारी एकदिवसीय संप पुकारला. 

यावेळी संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग साबळे, भीमा सीताफळे, इस्माईल शेख, दत्ता मुरुमकर, नागनाथ खंडागळे, दत्ता हरपे आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात भाजीपाला लिलाव सुरळीत झाला. कामगारांनी पुकारलेल्या संपाची माहिती शेतकर्‍यांना देण्यात आल्याने बाजार समितीत कांदा व अन्य भुसार मालाची आवक नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. विशेषतः कांदा बाजारातील सुमारे 5 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

राज्य शासनाच्या नव्या धोरणामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांना विविध सोयीसुविधा मिळण्यासाठी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे जावे लागणार आहे. यामुळे कामगारांची मोठी गैरसोय होणार आहे. राज्य शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेऊन आहे त्याच जिल्हास्तरीय महामंडळात सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी यावेळी मापाडी हमाल संघटनेच्यावतीने करण्यात आली. 
या संपाची दखल राज्य शासनाने न घेतल्यास यापुढील काळात आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कामगारांचा राज्यव्यापी संप होता. बाजार समितीत आलेल्या मालाचे लिलाव झाले आहेत. मात्र कांदा व अन्य भुसार मालाची आवक नसल्याने सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली .