Thu, Apr 25, 2019 12:24होमपेज › Solapur › बाजार समितीच्या मतदार यादीत घोळ

बाजार समितीच्या मतदार यादीत घोळ

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 8:40PMसोलापूर : संतोष आचलारे

लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रसंगी मतदार यादीत ज्याप्रमाणे घोळ दिसून येतो तसाच घोळ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रारुप यादीत दिसून येत असल्याने मतदारांतून संताप व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांच्या मतदार यादीत प्रचंड चुका असल्याने या प्रारुप यादीवर प्रचंड हरकती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुवारी प्रारुप यादी निश्‍चित करुन गुरुवारी ही यादी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, दुय्यम सहायक निबंधक आदी कार्यालयांत ही यादी मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिली. शेतकर्‍यांना बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदार करुन घेण्यात आल्याने मतदार यादीत आपले नाही आहे की नाही हे पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी पडत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीत अजूनही अनेक मृत खातेदारांची नावे दिसून येत आहेत. शिवाय एकाच उतार्‍यावर अनेकांची नावे आहेत. यापैकी पहिले नाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचीही अंमलबजावणी व्यवस्थित झाली नसून सात-बारा उतार्‍यावरील वाटेल ते नाव मतदार यादीत घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

एकाच शेतकर्‍यांच्या नावाने अनेक उतारे आहेत. अशा शेतकर्‍यांची नावेही पुन्हा पुन्हा घेण्यात आली आहेत. वारस नोंद केलेल्या शेतकर्‍यांना कुटुंबातील ज्येष्ठता डावलून मनमानी पध्दतीने एक नाव मतदार यादीत ओढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रारुप मतदार यादीवर 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याकालावधीत हरकत असणार्‍या मतदारांना वेळेत अर्ज व पुरावा निवडणूक यंत्रणेकडे द्यावा लागणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीचे चावडीवाचन करण्यात येते. सोलापूर बाजार समितीची निवडणुकही एका विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणेच होत आहे. प्रारुप मतदार यादीत प्रचंड चुका असल्याने व शेतकरी मतदार शहरात येऊन प्रारुप यादी पाहून हरकती घेणे शक्य नसल्याने ही प्रारुप यादी गावनिहाय प्रत्येक ग्रामपंचायतीत ठेवण्यात यावी, याचे चावडीवाचन करण्यात यावे, अशी मागणी मतदारांतून होत आहे.