Sun, May 26, 2019 21:45होमपेज › Solapur › निकाल काहीही लागो ‘विजय’ मुख्यमंत्र्यांचाच!

निकाल काहीही लागो ‘विजय’ मुख्यमंत्र्यांचाच!

Published On: Jul 03 2018 1:55AM | Last Updated: Jul 03 2018 1:53AMसोलापूर : संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल काही जरी लागला तरी या निवडणुकीतील ‘विजय’ हा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच होणार असल्याचे चित्र मतमोजणीच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री यांनी रचलेल्या राजकीय खेळीत त्यांचाच ‘विजय’ होणार असल्याची माहिती राजकीय वरिष्ठांनी दिली आहे. 

भाजपच्या दोन मंत्र्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या पॅनेलमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. या पॅनेलचे प्रमुख नेते माजी आमदार दिलीप माने यांनी पालकमंत्र्यांच्या पॅनेलमध्ये आम्ही असून मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आपल्यालाच असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस प्रणित अस्तित्वात असलेल्या पॅनेलचा विजय झाला तर हा ‘विजय’ मुख्यमंत्री फडणवीस यांचाच असणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकर्‍यांना बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनीच अधिकारी मिळवून दिला आहे, असे वक्तव्य पालकमंत्री देशमुख यांनी केल्याने त्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्रीच असल्याचे स्पष्ट करुन देणारे आहे. 

दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करुन बाजार समितीत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणूक लढविली. ते स्वत: या निवडणुकीच्या मैदानात उतरले नसले तरी त्यांनी उभे केलेले उमेदवार हे पूर्णपणे भाजप पुरस्कृत असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या निवडणुकीत सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलला यश मिळाले तरीही या विजयाचे श्रेय अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही पॅनेलमधील कोणत्याही पॅनेलचा विजय झाला तर तो अखेर मुख्यमंत्र्यांचा ठरणार आहे. फडणवीस यांच्या सांगण्यानुसारच बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक घटना व घडामोडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सत्ता अखेर त्यांच्याकडेच जाण्याचा मार्ग स्पष्ट दिसून येत आहे. 

पालकमंत्री अपयशी ठरले तर मात्र होणार गोची!
बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये भाजपचे उमेदवार असल्याने यापैकी कोणाचाही विजय झाला तर तो भाजप व मुख्यमंत्री यांचा विजय ठरणारा झाला आहे. मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत पालकमंत्र्यांना अपयश आले तर मात्र भाजपचा दोन्ही बाजूकडून असलेला विजय हातून निसटणारा ठरणारा आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचे अपयश हे मुख्यमंत्र्यांना धोक्याचे आहे.