Wed, Jul 24, 2019 12:33होमपेज › Solapur › आज फैसला!

आज फैसला!

Published On: Jul 03 2018 2:16AM | Last Updated: Jul 03 2018 1:56AM सोलापूर/बार्शी : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीची तयारी  निवडणूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सोरेगाव येथील एसआरपी कॅम्प येथे प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली आहे. 

बार्शी बाजार समितीची मतमोजणी शहरातील उपळाई रस्त्यावरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. ही निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात आल्याने नेमका निकाल किती वाजता जाहीर होईल, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

सोलापूर बाजार समितीच्या शेतकरी प्रवर्गातून  निवडून द्यावयाच्या एकूण पंधरा जागांची आणि हमाल-तोलार या प्रवर्गातील जागेची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गणासाठी एक मतमोजणी  टेबल  ठेवण्यात आले असून त्यासाठी एक निवडणूक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक आणि इतर चार कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. ज्या गणात मतदारांची संख्या अधिक आहे अशा गणांसाठी अतिरिक्त मोजणी टेबलाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बोरामणी, होटगी अशा काही ठिकाणी मतदारांची संख्या अधिक असल्याने त्याठिकाणी अधिकचे मोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास 32 टेबलांवर या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या एका प्रतिनिधीला मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणीला विलंब होऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचार्‍यांची व्यवस्था त्याठिकाणी ठेवण्यात आली असून वेळप्रसंगी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली आहे. 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शेतकर्‍यांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक पार पडत असल्यामुळे निकालास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतमोजणीकरिता 31 टेबल केलेले असून एकावेळी एका गणातील दोन केंद्र मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत. अशा सात फेर्‍यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी राखीवसह मतमोजणी पर्यवेक्षक 35  व प्रति टेबलवर तीन सहाय्यक नेमण्यात आलेले आहेत. मतमोजणीकरिता पर्यवेक्षक म्हणून विविध शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख नेमण्यात आलेले आहेत. एक कोतवाल तसेच 2 रो ऑफिसर, मतमोजणी झाल्यानंतर मतपत्रिका जमा करण्याकरिता दोन टेबल ठेवण्यात आले आहेत. संगणक पथक, दोन मॅन्युअल टॅब्युलेशन पथक असे एकूण 190 अधिकारी, कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त केलेले आहेत. मतमोजणीसाठी पुरसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला असून ओम हॉटेल व एकता गणपती याठिकाणी रोडवर बॅरिगेटस् लावले जाणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी कक्षात व आवारात मोबाईल वापरास बंदी आहे. मतमोजणी कक्षात व कक्षाबाहेर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मतमोजणी कक्षात 4 व बाहेर एक व्हिडिओग्राफर ठेवण्यात येणार असून मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके यांनी दिली आहे.

अशी असेल मोजणीची यंत्रणा 
सोलापुरात शेतकरी गटातील व हमाल-तोलार प्रवर्गातील मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार असून एकूण 32 टेबलांवर ही मोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलासाठी 1 निवडणूक पर्यवेक्षक, 2 सहायक आणि इतर 4 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मतदान केंद्रात प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला प्रवेश दिला जाणार आहे. हमाल-तोलार प्रवर्गातील मोजणी संपल्यानंतर त्या टेबलावर व्यापारी आणि अडते प्रवर्गातील जागेसाठीची मोजणी सुरू करण्यात येणार आहे.