Wed, Apr 24, 2019 07:51होमपेज › Solapur › बाजार समितीच्या सत्तेसाठी ‘कर’नाटकी पॅटर्न!

बाजार समितीच्या सत्तेसाठी ‘कर’नाटकी पॅटर्न!

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 9:19PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी पक्षीय समिकरणे बाजूला ठेवून, ‘कर’नाटकी पॅटर्न राबविण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गट तटाच्या राजकारणातून ताकदवान कुमारस्वामींची ऐनवेळी बाजार समितीच्या सभापती वर्णी लागण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील अग्रेसर संस्था आहे. सहकारी क्षेत्रात असतानाही कोट्यवधी रुपयांचा निवळ नफा या संस्थेला मिळत असल्याने या संस्थेवर आपली सत्ता मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांनी रणशिंग पुकारले आहे. शेतकर्‍यांना दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे पहिल्यादांच बाजार समितीची निवडणूक वेगळी ठरली आहे. काँग्रेसच्या ताब्यात असणारी ही संस्था राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रशासकाची ढाल पुढे करुन गत वर्षभरापासून आपल्या ताब्यात ठेवली आहे. माजी आ. दिलीप माने व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दृष्टीने ही लढाई प्रतिष्ठेची व विधानसभेची अंदाज घेणारी ठरली आहे. 

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली कांही दिवसांपूर्वीच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. मात्र एकीकडे काँग्रेसच्या गटात जाणारे कार्यकर्ते जास्त असल्याने व पक्षांतर्गत विरोधी वातावरण दिसून येत असल्याने सहकार मंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला कितपत यश मिळेल, याबाबत शंका उपस्थित होत आहे. 

राष्ट्रवादीचे नेते बसवराज बगले यांनी सर्वच पक्षातील राजकीय पुढार्‍यांना एकत्रित करुन बाजार समितीसाठी स्वतंत्र झुंज देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांपुढे त्यांचा संघर्ष कितपत टिकेल, याबाबत शंका उपस्थित होत आहे. शिवसेना नेते गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखालीही स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची हालचाली असल्या तरी ऐनवेळी हा गोतावळाही काँग्रेसच्या कोट्यात शिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा कौल मात्र नेमका कोणाकडे आहे, याचाच अंदाज अजून तरी कोणालाही लागत नसल्याचे दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर रिंगणातील उमेदवार पाहूनच त्यानुसार मतदान होण्याची परिस्थिती आहे. सहकार मंत्री देशमुख यांना प्रशासकाच्या माध्यमातून या संस्थेवर अप्रत्यक्षपणे सत्ता ठेवण्यात आतापर्यंत यश आले असले तरी काँग्रेसच्या बेरजेच्या गोतावळ्यापुढे व पालकमंत्री देशमुख यांच्या राजकीय खेळीत त्यांचा कितपत निभाव लागणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

देशमुखविरुद्ध देशमुख वादाचा फटका बसणार?

सहकारमंत्री देशमुख व पालकमंत्री देशमुख हे दोघेही एकाच पक्षात असले तरी ही निवडणूक पक्षीय नसल्याची भूमिका पालकमंत्री देशमुख यांनी कांही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत देशमुख विरुध्द देशमुख अंतर्गत वादाचा फटका भाजपाला बसण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुढे करुन माजी आ. माने यांनी काँग्रेस पक्षातील सर्व जुने राजकीय वैर्‍यांना एकत्रित करुन लढाईचे रणशिंग महिनाभरापूर्वीच फुंकले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांची ताकद व शेतकर्‍यांचा संपर्क जास्त दिसून येत आहे. 

असे असेल संभाव्य गट, पक्ष

काँग्रेस : आ. सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके , बळीराम साठे, अविनाश मार्तंडे, प्रवीण देशपांडे. भाजप : (सहकारमंत्री गट : शहाजीराव पवार, ताराबाई पाटील आदी), पालकमंत्री गट : उमेदवार ऐनवेळी ठरण्याची शक्यता.