Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Solapur › माने, पाटील यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील?

माने, पाटील यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील?

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:45PM सोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या सभापती- उपसभापती पदांच्या निवडी सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या सभागृहात होणार आहेत. यावेळी सभापतिपदासाठी पुन्हा माजी आ. दिलीप माने आणि उपसभापतिपदासाठी वसंतराव पाटील यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याचे अधिकृत वृत्त आहे. मात्र, सध्या बाजार समितीच्या मागे चौकशीचा ससेमिरा आणि 39 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचा त्रास नको म्हणून ऐन वेळी यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जर पक्षश्रेष्ठींचे एकमत झाल्यास या निवडी बिनविरोध झाल्या तर ठिक अन्यथा यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आल्यास त्याचीही तयारी प्रशासनाने ठेवली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावलेल्या माजी आमदार दिलीप माने यांच्या नावालाच अधिक पसंती असल्याने पहिल्यांदा त्यांनाच संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र बाजार समितीच्या मागे चौकशीचा लागलेला ससेमिरा आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे काही अडचणी आल्यास नव्या संचालकांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेअरमनपदासाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र निवडीची सर्वस्वी जबाबदारी पक्षश्रेष्ठींवर आहे, तर व्हाईस चेअरमनपदासाठी राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे, वसंतराव पाटील यांची नावे आघाडीवर येत आहेत. त्यामुळे नेमके काय होणार हे आज स्पष्ट होणार आहे.