Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Solapur › सोलापूर बाजार समितीसाठी सहकारमंत्र्यांविरोधात महाआघाडी

सोलापूर बाजार समितीसाठी सहकारमंत्र्यांविरोधात महाआघाडी

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:32PMसोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पॅनेलविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाआघाडीचे आव्हान दिले आहे. पालकमंत्री विरुद्ध सहकारमंत्री अशी थेट लढतच होत असल्याने हा विषय राज्यभरासाठी चर्चेचा ठरला आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा मंगळवार अखेरचा दिवस होता. दुपारी तीननंतर आ. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या  घरी महाआघाडीतील प्रमुख नेत्यांनी पत्रकारांना पॅनेलमधील उमेदवारांची माहिती दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे कुंभारी मतदारसंघातून आपल्या पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहेत. शेतकरीहितासाठी निर्माण करण्यात आलेल्या महाआघाडीच्या पॅनेलमध्ये पक्षीय स्थान नसल्याची माहिती यावेळी आ. म्हेत्रे यांनी पत्रकारांना दिली. 

यावेळी माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, बाजार समितीचे माजी संचालक सुरेश हसापुरे आदी उपस्थित होते. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना पॅनेलमधून उभे राहण्याची विनंती करण्यात आली होती; मात्र त्यांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांचा पॅनेलमध्ये समावेश नाही. मुस्ती मतदारसंघात पॅनेलमधील उमेदवारास निवडून आणण्यासाठी आपला पुढाकार असल्याचे म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित श्री सिध्देश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलची घोषणा करण्यात आली असून, यामधील उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली. हिरज मतदारसंघातून माजी सभापती दिलीप माने यांच्याविरोधात भाजपचे श्रीमंत बंडगर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुस्ती राखीव मतदारसंघात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असून याच मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीशैल नरोळे, तर भाजपचे तालुकाध्यक्ष सिध्दाराम हेले हेदेखील एकमेकांविरोधात लढत असल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. 

पालकमंत्री देशमुख व सहकारमंत्री देशमुख यांच्यातील वादामुळे भाजप अंतर्गत फूट पडण्याची शक्यता होती. आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असून कोणत्याही पॅनेलचा आपला संबंध नसल्याची भूमिका पालकमंत्री देशमुख यांनी घेतली होती. मात्र अचानक त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये प्रवेश केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.