Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Solapur › बाजार समितीत शेतकर्‍यांना व्यापार्‍यांसमोर होते मारहाण

बाजार समितीत शेतकर्‍यांना व्यापार्‍यांसमोर होते मारहाण

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:12PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांना दादागिरी दाखवून त्यांचा माल सक्तीने काही ठराविक अडत्यांकडे नेला जातो. व्यापार्‍यांसमोर शेतकर्‍यांना मारहाण करण्यात येते, असा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख व पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांच्यासमोर भरसभेत केल्याने याप्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. 
बाजार समितीवतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतमाल तारण योजनेतील पात्र शेतकर्‍यांना कर्ज धनादेश वाटपाचा कार्यक्रम सोमवारी  मार्केट यार्डातील वि.गु. शिवदारे सभागृहात घेण्यात आला. यावेळी सभेत बोलताना पवार यांनी ही माहिती सांगितली. 

गत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती आहे. राज्याचे सहकारमंत्री या नात्याने ना. देशमुख यांचे बारीक लक्ष या बाजार समितीवर होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष पवार व ना. देशमुख यांचे एक खासगी स्विय सहायक सातत्याने बाजार समितीच्या प्रशासकांना मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम करीत असताना दिसून आले आहेत. मग असे प्रकार घडतातच कसे. असे प्रकार होत असले तर मग ते रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न यावेळी शेतकर्‍यांसमोर पडला.

 बाजार समितीत सुरू करण्यात आलेले सीसीटीव्हीसुद्धा गत सहा महिन्यांपासून बंद असून प्रशासकांनी हे सीसीटीव्ही का सुरु केले नाहीत. यासाठी प्रशासकांच्या गॉडफॉदरनी पडद्यामागून सल्ला व मार्गदर्शन का केले नाही, असा प्रश्‍न यावेळी सभेनंतर शेतकर्‍यांतून उपस्थित होत होता.