Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Solapur › मराठा मोर्चा चक्काजाम आंदोलन चिघळले; १० एसटी बस फोडल्या (Video) 

मराठा मोर्चा चक्काजाम आंदोलन चिघळले; १० एसटी बस फोडल्या (Video) 

Published On: Jul 21 2018 4:29PM | Last Updated: Jul 21 2018 9:47PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी शांततेने मोर्चे काढलेल्या मराठा समाजाला केवळ झुलवत ठेवणार्‍या शासनाचा निषेध करीत येथील शिवाजी चौकात शनिवारी चक्‍काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या या चक्‍काजाम आंदोलनास हिंसक वळण लागले असून, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे एक एस.टी. बस पेटवून देण्यात आली, तर बार्शी, पंढरपूर, मोहोळ आदी तालुक्यांत एस.टी. बसेस फोडण्यात आल्या.  

शासनाने घोषित केलेले 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला तातडीने देण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. गतवेळच्या मूकमोर्चाच्या तुलनेत या चक्‍काजाम आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी असली तरी त्यांची आक्रमकता ही प्रचंड होती. त्यामुळे सोलापूर, पंढरपूर आणि वडाळा यासारख्या ठिकाणी दगडफेकीच्या प्रकाराने आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामध्ये दहा एस.टी. बसेसचे नुकसान झाले.

सोलापूर शहरामध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत महाराष्ट्र शासनाचे श्राद्ध घालून मुंडण केले.
 जुना पुना नाका चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून काही जमावाने छत्रपती शिवाजी चौकाकडे कूच केली, तर काही जमाव तुळजापूर नाक्यावर पोहोचला. या दोन्ही ठिकाणी अकराच्या सुमारास एकाचवेळी कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. शिवाजी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री विजयुकमार देशमुख  यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

त्यानंतर एसटीस्थानकात तीनही बाजूच्या एसटी बसेस कार्यकर्त्यांनी रोखून धरल्या. त्यामुळे शिवाजी चौकापासून नवी वेस चौकीपर्यंत एसटी बस, टेम्पोच्या रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी तुळजापूर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मारून रस्त्यावरच मुंडण आंदोलन केले. येथेही मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करताना जोपर्यंत 16 टक्के आरक्षण जाहीर करत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र तासाभराने साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करत प्रमुख कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले.

दहा एसटी बसेस फोडल्या; एक पेटवली

शिवाजी चौकामध्ये एसटीच्या रांगा थांबल्यानंतर मध्येच एका एसटी ड्रायव्हरने दुसर्‍यामार्गे एसटी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक जमावाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी पळत जाऊन एसटीला अडविले आणि त्या एसटीवर दगडफेक करत एसटीच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सोलापूर एसटी स्थानकावरील एसटी बस वाहतूक सुरळीत सुरु झाली. मात्र तासाभरातच  मोहोळ, नान्नजमार्गे येणार्‍या एसटी बसेस अडवून त्यातील प्रवाशांना बाहेर काढून एसटीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. नान्नजवरून येणार्‍या एसटी बसला आडरानातच थांबवून पेटवून देण्यात आले. त्यात एसटी जळून खाक झाली. या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात रस्त्यावर दिसेल त्या एसटी बसेस फोडण्याला जणू ऊत आला. विशेषतः बार्शी आणि मोहोळ मार्गावर दिवसभरात आठ गाड्या फोडल्या, तर एक गाडी पेटवून देण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास सोलापूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये चालक-वाहकांनी याबाबत फिर्याद दिली.

परिवहनचे मोठे नुकसान ः हानगल

आजच्या मोर्चामध्ये आज दिवसभरात दहा गाड्या फोडण्यात आल्या, तर एक जाळण्यात आली.  शिवाय गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी पेनूर गावाजवळ दोन एसटी बसेस फोडण्यात आल्या. त्यामध्ये परिवहन मंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या लाल एसटी बसेसची निर्मिती बंद आहे. त्यामुळे एसटी बसेसचा तुटवडा आहे. शिवाय पंढरपूरच्या वारीमुळे या मार्गावर जादा गाड्या सोडल्या आहेत. दोन दिवसांत बारा गाड्या कमी झाल्याने त्याचे येणारे उत्पन्नही बुडाले आहे, अशी माहिती सोलापूर आगाराचे वाहतूक निरीक्षक पी.एस. हानगल यांनी दिली.

दहा एसटी बस फोडल्या : एक पेटवली

शिवाजी चौकामध्ये एसटीच्या रांगा थांबल्यानंतर मध्येच एका एसटी ड्रायव्हरने दुसर्‍या मार्गे एसटी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक जमावाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी पळत जाऊन एसटीला अडविले आणि त्या एसटीवर दगडफेक करत एसटीच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सोलापूर एसटी स्थानकावरीस एसटीबस वाहतूक सुरळीत सुरु झाली मात्र तासाभरातच  मोहोळ,नान्नज मार्गे येणार्‍या एसटी बस अडवून त्यातील प्रवाशांना बाहेर काढून एसटीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. नान्नज वरून येणार्‍या एसटी बसला आडरानातच थांबवून पेटवून देण्यात आले. त्यात एसटी जळून खाक झाली. या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात रस्त्यावर दिसेल त्या एसटी बस फोडण्याला उत आला आणि सायंकाळी चार पर्यंत शहर व जिल्ह्यात  दहा एसटीबसची तोडफोड करण्यात आली.