Sat, Jul 20, 2019 02:11होमपेज › Solapur › बंद काळात अनुचित प्रकार घडणार नाही!

बंद काळात अनुचित प्रकार घडणार नाही!

Published On: Jul 28 2018 11:00PM | Last Updated: Jul 28 2018 10:02PMसोलापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा, संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटनांनी सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. या बंद काळात कोणताही अनुचित प्रकार  घडू देणार नसल्याचे सांगत काळजी घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देऊन बंद शांततेत पार पाडू, असे आश्‍वासन मराठा समाजबांधवांनी दिले आहे. 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात प्रभारी पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्या उपस्थित मराठा संघटनांची बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांचे पोलिस आयुक्तालयाच्यावतीने स्वागत आणि प्रास्ताविक केले. 

बैठकीत दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, माऊली पवार, दास शेळके, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, शाम कदम, सुनील रसाळे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.  सोलापूर बंद काळात आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही याची काळजी घेऊ आणि आमच्या कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देऊ व अत्यावश्यक सेवांना कसलीही अडचण, अडथळा होऊ देणार नाही अशा पद्धतीने शांततेने सोलापूर बंद पार पाडू, असे सांगितले.

बैठकीस तुकाराम मस्के, योगेश पवार, किरण पवार, प्रताप चव्हाण, राजन जाधव, रवी मोहिते, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे, सुहास कदम, श्रीकांत सुरवसे, राज नवगिरे, चेतन चौधरी यांच्यासह 60-70 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पोलिस विभागाकडून उपायुक्त अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, डॉ. दीपाली काळे, रुपाली दरेकर, वैशाली शिंदे, रमेश चोपडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सर्व पोलिस  ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,  शाखा प्रभारी अधिकार्‍यांची उपस्थिती होती.  उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी बंद पुकारलेल्या काळात आंदोलकांनी कोणासही जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास लावू नयेत, अत्यावश्यक सेवा, शाळा, अ‍ॅम्ब्युलन्स, दूध व भाजीपाल्याची वाहने अडवू नयेत, आपल्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवावे, कोणीही कायदा हातात घेऊन तोडफोड करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नाही याची तुम्ही जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगत अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य तो पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आंदोलकांनी या बंदला अनेक संघटना, पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे सांगत नवी पेठ व्यापारी असोसिएशन, मार्केट कमिटीचे सभापती, सदस्य, विजापूर वेस मुस्लिम व्यापारी संघटना, पद्मशाली समाज, दलित संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले.