Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Solapur › मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ आघाडीवर

मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ आघाडीवर

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:42PMसोलापूर : प्रतिनिधी  

 क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरू झालेल्या 63 व्या 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय शालेय पोल मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी आघाडी घेतली आहे.

मुलांच्या पोल मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे सागर राणे (मुंबई) याने 7.50 गुण मिळवत प्रथम, अनिकेत गोळे (सातारा) याने 7.20 गुण मिळवत द्वितीय, कृणाल दरवान (रत्नागिरी) याने 7.15 गुण मिळवत तृतीय, तर जराळ कॉड्रस  (मुंबई उपनगर) याने 7 गुण मिळवत चौथा क्रमांक पटकाविला. सांघिक अनिवार्य संचात महाराष्ट्र संघाने आघाडी घेतली आहे. 10 गुणांची ही स्पर्धा आहे. दीड मिनिटात खेळाडूंनी चित्तथरारक कसरती सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्या राऊंडमध्ये किमान 5 गुण मिळविणे आवश्यक असताना महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवत आघाडी घेतली.

पोल मल्लखांब स्पर्धेत खेळाडूंनी घोडा उडी, दसरंग, सुईदोरा, बजरंग झाप, नागमोडी वेल, एक हाथी मयूर आसन, एक हाथी बॅलन्स, मच्छनी घाणा, बंदर पकड आणि डीस माऊंट हे प्रकार सादर केले.
मुलींच्या रोप मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राची राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा मोरे (सातारा) आणि आदिती करंबेळकर (मुंबई) या दोघींनी अनुक्रमे प्रत्येकी 8.40 गुण मिळवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले तसेच हिमानी परब (मुंबई) हिने 8.05 आणि प्रणाली जगताप (सातारा) हिने 7.80 गुण घेत आघाडी घेतली.

मुलींनी रोप मल्लखांबमध्ये माऊंट, चारवेळा चढतीचा  वेल, नटराज आसन,  शवासन, वच्चीकासन, साधी उडी, क्रॉस, पद्मासन, पाद हस्तासन ते बजरंग झाप, गुरू पकड फरारा आणि मयुरपंखी फेक हे प्रकार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, विद्या भारती, दादरा नगर हवेली, सीबीएससी, गुजरात, गोवा, तेलंगणा, दिल्ली या राज्यांतील प्रत्येक संघातील 4 मुले, 4 मुली, 1 पुरुष प्रशिक्षक आणि 1 महिला प्रशिक्षक तसेच 1 व्यवस्थापक असे सर्व मिळून 88 खेळाडू सहभागी झाले आहेत. याशिवाय एकूण 16 पंच काम पाहात आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडत आहेत.

जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, विश्‍व मल्लखांब फेडरेशनचे सचिव उदय देशपांडे, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार  दिलीप गव्हाणे, राज्य मल्लखांब संघटना सहसचिव पांडुरंग वाघमारे, दुसरे सहसचिव विश्‍वतेज मोहिते, खजिनदार बापू समलेवाले, राष्ट्रीय मल्लखांबचे निरीक्षक विकास फाटक, क्रीडा मार्गदर्शक सुजित शेंडगे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या माया मोहिते, राष्ट्रीय पंच भूपेंद्र मालपुरे, एन. रामचंद्रन, सोलापूर जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, धनाजी पाटील, सुनील सवणे, राजू माने, सुहास छंचुरे, राजू प्याटी,  हणमंत कदम, बाळासाहेब शिंदे, जुबेर शेख, मेजर नीलकंठ शेटे, रतीकांत म्हमाणे, अनिल देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.