Tue, Oct 22, 2019 02:48होमपेज › Solapur › ‘मेक इन’ची सोलापुरात मुहूर्तमेढ

‘मेक इन’ची सोलापुरात मुहूर्तमेढ

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:50PM

बुकमार्क करा

सोलापूर : श्रीकांत साबळे

केंद्र-राज्य सरकारांच्या ‘मेक इन’ प्रकल्पाची मुहूर्तमेढ अखेर तीन वर्षांनंतर सोलापुरात रोवली जाणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली एमआयडीसी येथे तब्बल 90 एकर क्षेत्रावर पहिल्या प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायांना मागील काही वर्षांपासून ग्रहण लागले आहे. यंत्रमाग आणि विडी उद्योगावर संकट आल्यानंतर येथील उद्योग देशोधडीला लागतो की काय, अशी अवस्था निर्माण झालेली असतानाच वस्त्रोद्योग खात्याकडून मेगा कल्स्टरचे स्वप्न तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपच्या सरकारने दाखविले; परंतु अद्याप याचा कोठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे सोलापूरच्या विकासाकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा सूर आवळला जात असतानाच आता केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘मेक इन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसी या ठिकाणी तब्बल 90 एकर क्षेत्रावर मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. 

सोलापूरच्या उद्योग क्षेत्रातील प्रमुख कंपनी असणार्‍या बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा केला जाणार आहे. कंपनीचे व्यवस्थापक संचालक राम रेड्डी यांनी सोलापूर येथे ‘मेक इन’ अंतर्गत प्रकल्प उभा करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावामध्ये 120 एकर जागेची मागणी करण्यात आली होती; परंतु शासनाकडून 90 एकर मंजूर करण्यात आली आहे. कंपनीकडून या प्रकल्पाला लवकरच सुरुवात केली जाणार असून कंपनीकडून कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाणार याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही; परंतु ‘मेक इन’च्या धर्तीवर हटके उत्पादन कंपनीकडून केले जाईल, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. 
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19