Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Solapur › महात्मा बसवेश्‍वरांना अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर 

महात्मा बसवेश्‍वरांना अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर 

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 9:48PMसोलापूर : प्रतिनिधी

महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त   कोंतम चौकातील बसवेश्‍वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. सोलापुरातील प्रमुख राजकीय नेत्यांनीसुद्धा महात्मा बसवेश्‍वर यांना अभिवादन केले.

कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्यास व महापालिकेतील कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर यांच्या  प्रतिमेस महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  परिवहन  सभापती तुकाराम  मस्के, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर, नगरसेविका ज्योती बमगोंडे, संगीता जाधव, विजय पुकाळे, विजय बमगोंडे, जगदीश पाटील, संदीप कुर्डे, अशोक बिराजदार, इरेश स्वामी, सुरेश लिंगराज, भास्कर सामलेटी, सिद्धू तिमीगार, अशोक खडके, महादेव येळे आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी कोंतम  चौकातील जयंतीला महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायंकाळी मोठी  मिरवणूक काढण्यात येते. यंदाच्या वर्षी कोंतम चौकात बसवेश्‍वर सर्कलच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा बसवेश्‍वर यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला होता. कर्नाटकातील बाराव्या  शतकातील थोर संत म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेविरुद्ध व हानीकारक प्रथांविरुध्द संघर्ष केला. ‘कायकवे कैलास’ म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार बसवेश्‍वर महाराजांनी मांडला.

कोंतम चौकातील बसवेश्‍वर पुतळ्यापासून जंगी मिरवणूक काढली जाते. शहराच्या वेगवेगळ्या परिसरांत व चौकांत बसवेश्‍वर जयंती सोहळा मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. बसवेश्‍वर जयंतीला वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्यास वीरभद्र बसवंती यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापूजा झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मल्लिकार्जुन मंदिरापासून पांरपरिक पध्दतीने मध्यवर्ती  मंडळाच्यावतीने  व शहरातील इतर सामाजिक मंडळांच्यावतीने मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक चाटी गल्ली, भुसार गल्ली, मधला मारुती, बाळी वेस, टिळक चौक आदी भागांतून जात बाळी वेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली.

यावेळी अ‍ॅड. मल्लिनाथ राचेट्टी, जगदीश पाटील, सुदीप चाकोते, आप्पा दुर्गे, अमित गुळगी, अमोल कामाणे, आशिष दुलंगे, शिवा घंटे, सिध्दाराम जक्कापुरे आदी उपस्थित होते.