होमपेज › Solapur › माऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा

माऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:25PMसोलापूर ः प्रतिनिधी

 दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे माऊलींच्या अश्‍वाचा गोल रिंगण सोहळा झाला. आबालवृध्दांपासून  ते तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालकमंत्री वियजकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, पोलिस आयुक्‍त एम.बी. तांबडे यांच्या हस्ते पालखी पूजा व अश्‍व पूजेने रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला.

माघवारी पालखीच्या भव्य गोल रिंगण सोहळ्याची तयारी अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. परंपरेप्रमाणे वारीची लगबग माघ महिन्यामध्ये सुरु होते. मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास श्री मार्कंडेय मंदिर येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन ह.भ.प. भागवत महाराज चवरे, किसन बापू कापसे, गणेश वारे यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर शहरातील 43 दिंड्या व परिसरातील 55 दिंड्या सायंकाळी 4.30 च्या सुमारास पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये दाखल झाल्या. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा रिंगण सोहळा झाला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात समरस होऊन महिला व पुरुषांचा रिंगण सोहळ्यात सहभाग दिसून आला.

रिंगण  सोहळ्यास सुमारे 100 ध्वजाधारी भाविकांकडून प्रारंभ करण्यात आला. नंतर मृदंग टाळकरी भाविकांचे रिंगण सुरू झाले. यामध्ये सुमारे 100 ते 200 भाविकांनी सहभाग घेतला होता. 100 ते 150 तुळस व जलकुंभधारी महिलांचा रिंगण सोहळा झाला. तपोवृद्ध व  वयोवृद्ध विणेकरी-चोपदारांचा रिंगण सोहळा झाला.तद्नंतर अश्‍वाचे रिंगण सुरू झाले व भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. माऊलीमय वातावरणातील भाविकांचा उत्साह दिसून आला.

तेथून महादेव मंदिर, साठे चाळ येथे हरिदास शिंदे यांनी पारंपरिकरितीने पालखीची आरती केली. भाविकांच्या द्विगुणित उत्साहात पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. पार्क स्टेडियम येथील रिंगण सोहळ्यास नगरसेवक आनंद चंदनशिवे, विनोद भोसले, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, दत्ता सुरवसे, मोहन कांबळे, मनिष देशमुख, डॉ. राजेंद्र भारुड (जि.प. सीईओ), वीरेश प्रभू (एसपी) आदींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.