Tue, Jul 23, 2019 04:22होमपेज › Solapur › रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज परत

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज परत

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 8:58PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आणि रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे मुंबईच्या महिलेला रिक्षात विसरलेले 5 तोळे सोन्याचा 1 लाख  70 हजारांचा मुद्देमाल परत मिळाला आहे.  ही घटना सोलापूर येथील स्टेशन चौकी येथे रविवारी सकाळी घडली आहे. याबाबत रिक्षाचालक कमुलाल पटेल, पोलिस उपनिरीक्षक नारायण भोसले, ठाणे अंमलदार गणेश माने, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

कल्पना जनार्धन तोरणे (रा. ठाणे) या आपली मुलगी श्रुतीसह मुंबईहून सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसने लग्न कार्यक्रमासाठी सोलापूरला आल्या होत्या. सोलापूर रेल्वे स्टेशनजवळील गणेश हॉटेल येथून त्यांनी रिक्षा केली. त्या रिक्षाने सिद्धार्थ चौक येथे पाहुण्याकडे पोहोचल्यानंतर आपली महत्त्वाची बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. 

कल्पना तोरणे यांनी रेल्वे स्टेशनजवळील स्टेशन चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली.तत्काळ घटनेची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक नारायण भोसले, ठाणे अंमलदार गणेश माने, प्रशांत चव्हाण यांनी बॅगेतील  मोबाईलवर संपर्क करून रिक्षाचालकास चौकीला बोलावून घेतले. 

रिक्षाचालक कमुलाल पटेल यांनी रिक्षात विसरलेली पिशवी परत केली. यामध्ये  मंगळसूत्र 4 तोळे, गंठन 1 तोळे, कर्णफुले, रोख रक्कम 10 हजार आणि 2 मोबाईल हँडसेट असा 1 लाख 70 हजारांचा ऐवज मिळाला. तो कल्पना तोरणे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी तोरणे यांनी रिक्षाचालकास  एक हजार बक्षीस दिले. आयुष्यभराची पुंजी परत मिळाल्याने कल्पना तोरणे यांनी पोलिसांचे आणि दागिने परत करणार्‍या रिक्षाचालकाचे आभार मानले.