Wed, Jul 24, 2019 08:15होमपेज › Solapur › शिंदे साहेब, लोक आपली वाट पाहताहेत

शिंदे साहेब, लोक आपली वाट पाहताहेत

Published On: May 09 2018 10:21PM | Last Updated: May 09 2018 9:10PMपंढरपूर : नवनाथ पोरे 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मोर्चेबांधणी सुरू झाली असली तरी ज्या चुका 2014 साली झाल्या त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होत आहे. त्यामुळे शिंदे साहेब मागच्या चुका टाळून पुढे जाणार का पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असे होणार, असा सवाल निष्ठावान कार्यकर्त्यांना पडला आहे. 
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा अवधी असला तरी त्यापूर्वीच निवडणूका होतील असे गृहीत धरून राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. 2014 च्या मोदी लाटेत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  भाजप उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्याकडून 1 लाख 75 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते. ज्या अनेक गावांत शरद बनसोडे त्यावेळी आणि अजूनही गेले नाहीत त्या गावांनी बनसोडे यांना भरभरून मते दिली. हा पराभव काँग्रेसपेक्षा शिंदे यांना अधिक  धक्कादायक होता. कारण निवडणुकीपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व तालुक्यांत भव्य मेळावे घेतले होते, जेवणावळी उठवल्या होत्या. तालुका आणि गावपातळीवरील पुढार्‍यांना खूश केले होते.  मात्र अगोदरच्या 5 वर्षांत केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांचा लोकांशी थेट संपर्क तुटला होता आणि निवडणुकीच्या काळात मोदी लाटेपुढे गावपातळीवरचे पुढारी हतबल झाले. अनेक गावांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनीच भाजपला मतदान करवून घेतले एवढी भयाण परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. 

त्यामुळे तालुका आणि गावपातळीवरच्या पुढार्‍यांवर किती अवलंबून राहावे याचा पुनर्विचार शिंदे यांना करावा लागणार आहे. लोकांना हल्ली आपल्या नेत्यांमध्ये मध्यस्थ नको आहेत. ज्याच्यांशी थेट संपर्क होतो लोक त्यालाच पसंती देतात. असे असूनही  2014  नंतर  सुशीलकुमार  शिंदे लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत . केवळ सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून, मेळावे घेऊन आणि जेवणावळी उठवून लोक मते देत नाहीत, हे यापूर्वी सिद्ध झालेले  आहे.  सद्यपरिस्थितीत खा. शरद बनसोडे यांचाही लोकांशी संपर्क स्थापित झालेला नाही. त्यांचेही काम ‘उंटावरून शेळ्या राखण्या’च्या थाटाचे आहे. त्यामुळे आजघडीला कोणतीही लाट बनसोडे यांना वाचवू शकेल, असे दिसत नाही. खा. बनसोडे यांच्याबाबत असलेले नकारात्मक जनमत लक्षात घेऊन भाजप येथील उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. खा. अमर साबळे यांचे सोलापूर मतदारसंघातील दौरे त्यामुळेच वाढल्याचे मानले जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात बनसोडे यांच्याविषयी लोकांची नाराजी असली तरी भाजपविषयी अजूनही  पूर्णपणे नकारात्मक भावना निर्माण झालेली नाही. काँग्रेसविषयी सहानुभूती निर्माण होत असली तरी ती विजयासाठी पुरेशी ठरणार नाही. सक्षम पर्याय नसल्यामुळे नरेंद्र मोदी यांची जादू लोकसभेला यावेळीही चालू शकेल, अशी परिस्थिती आहे. 2019 ला  भाजपने नवीन उमेदवार दिल्यास लोक पुन्हा नवीन पर्याय शोधासाठी  भाजपच्या नवीन चेहर्‍याचा विचार करू शकतील. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना  यावेळीसुद्धा  गाफिल राहून चालणार नाही. त्यांना लोकांपर्यंत जावे लागणार आहे,  त्यांच्याशी संवाद, संपर्क वाढवावा लागणार आहे. अशाप्रकारे केवळ मेळावे, सभांतून हजेरी लावणे पुरेसे ठरणार नाही. मोदीविरोधी लाटेत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील जिंकले, खा. बनसोडे यांच्याबाबत नाराजी असताना विजयदादांबाबत मात्र माढा मतदारसंघात सकारात्मक वातावरण असण्याचे कारण त्यांचा जमिनीवरील वावर, लोकांशी, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क हेच आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतीत याच गोष्टीचा अभाव आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी 2014 साली ज्या चुका केल्या त्याच पुन्हा करू नयेत, लोकांशी थेट संपर्क ठेवावा, गावपातळीवर जाऊन लोकांच्या प्रश्‍नांची माहिती घ्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून ही व्यक्त होत आहे.  दरबारी राजकारणातून बाहेर यावे आणि  जनतेत मिसळावे, अशी अपेक्षा आहे.  राज्यात  तरी 2014  पेक्षा चांगले वातावरण विरोधकांसाठी निर्माण होत आहे. परंतु त्याचा योग्य वापर करून घेण्याची आवश्यकता  आहे अन्यथा पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती होऊ शकते.