Sat, Mar 23, 2019 12:01होमपेज › Solapur › आंदोलनाचा यज्ञ धगधगत ठेवणार

आंदोलनाचा यज्ञ धगधगत ठेवणार

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:51PMसोलापूर : प्रतिनिधी

कर्नाटकात स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता मिळाली. आता महाराष्ट्रातही ती दिली गेली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रात आंदोनलनाचे यज्ञ सुरू झाले आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार लिंगायत स्वतंत्र धर्माची मान्यता देत नाही, तोपर्यंत आंदोलनाचे यज्ञ अखंड सुरू राहील. महाराष्ट्राच्या मान्यतेनंतर लागलीच संविधानात्मक दर्जा आणि अल्पसंख्याक धर्माच्या दर्जासाठी दिल्लीत आंदोलन सुरू होईल. या धर्माच्या यज्ञात सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन प्रथम महिला जगद‍्गुरू डॉ. माते महादेवी, बंगळूर यांनी केले.

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही लिंगायत धर्माला मान्यता द्यावी, केंद्र सरकारने या धर्माला संविधानिक दर्जा द्यावा आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने सोलापुरात महामोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय गेट समोर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, भालकी बीदर, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामी, अहमदपूरकर, स्वामीनाथ स्वामी, किरीटेश्‍वर संस्थान मठ, सोलापूर, चन्‍नबसवानंद महास्वामी, दिल्ली, बसवजय मृत्युंजय महास्वामी, कुडलसंगम, डॉ. सिद्धराम स्वामी, नागणसूर मठ, अ‍ॅड. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर, राष्ट्रीय सरचिटणीस अशोक मुस्तापुरे, राज्य समन्वयक माधवराव टाकळीकर, सोलापूर जिल्हा समन्वयक विजयकुमार हत्तुरे, राज्य सरचिटणीस विजय बुरकूल, सकलेश बाभुळगावकर, विकास मरगूर, अमित रोडगे, प्रा. शिवानंद आचलारे, सिद्धाराम कटारे, मयूर स्वामी, सुहास उपासे, प्रा. राहुल बोळकोटे, काशिनाथ झाडबुके, बसवराज पाटील, चंद्रशेखर करोटे, वीरेंद्र मंगळगे, सुधीर सिंहासने, प्रदीप बुरांडे, गुराप्पा पड्डशेट्टी आदी उपस्थित होते.

माते महादेवी म्हणाल्या की, लिंगायत धर्म हा कोणाच्या विरोधातला धर्म नाही किंवा हा मोर्चासुद्धा कुणाच्या विरोधात नाही. आम्ही आमच्या न्याय हक्‍कासाठी लढतो आहोत. त्यामुळे कुणी आम्हाला विरोध करु नये. मात्र तरी अनेकांनी याला प्रचंड विरोध केला. आजचा यशस्वी मोर्चा पाहता सर्व विरोधक वार्‍यासारखे उडून गेल्याचे दिसते. हीच बसवेश्‍वर महाराजांच्या लिंगायत धर्माची शक्‍ती आहे. 

लिंगायत धर्म भारतीय राज्यघटनेचे सर्व निकष पूर्ण करतो, त्यामुळे याला मान्यता मिळण्यास काहीच शंका नाही. तरीदेखील जर केंद्र सरकारने जाणून बुजून मान्यता दिली नाही, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू आणि तिथे आम्हाला नक्‍कीच न्याय मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. 

किरीटेश्‍वर मठाचे स्वामिनाथ स्वामी म्हणाले की, कर्नाटक हा आमचा वडीलभाऊ आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि नंतर तेलंगणाचा नंबर लागतो. या तीनही राज्यात लिंगायत धर्मींयांची मोठी संख्या आहे. विशेष म्हणजे या तीनही राज्याचा मोठा भूभाग हा निजामशाहीमध्ये होता. अगदी तेव्हापासून लिंगायत धर्माचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र त्याला मान्यता दिली जात नाही. महात्मा बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात या धर्माची स्थापना केली. मात्र आज एकविसावे शतक उजाडल्यावरही दहा शतकांपासून याला मान्यता मिळण्यासाठी आम्ही अपयशी ठरतो, याचे कारण म्हणजे आपलेच लिंगायत बांधव आपले पाय ओढताहेत हे आपले दुर्दैव आहे. त्यांना बाजूला सारुन आपण हा धर्मयज्ञ पूर्ण केला पाहिजे.

1938 ला लिंगायत धर्मीयांची परिषद झाली तेव्हापासून ही मागणी होती. त्याआधी लिंगायत धर्मीयांची स्वतंत्र जनगणना व्हावी, या मागणीने जोर धरला होता. मात्र अद्यापही या मागण्या मान्य झाल्या नाहीत. आता आपण सारे एकत्र येऊन स्वतंत्र धर्माची मागणी  केली तरच लवकर आपल्या मागण्या मान्य होतील.

प्रारंभी विजयकुमार हत्तुरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. आनंद कर्णे यांनी केले, तर आभार अमित रोडगे यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.-कोण काय म्हणाले.. चन्नबसवानंद महास्वामी, दिल्ली ः कर्नाटकात आपण लढाई जिंकली आहे. आता महाराष्ट्रातील लढाई जिंकायची आहे. महाराष्ट्रातील लढाई जिंकली की दिल्लीत लढाई जिंकल्यासारखेच आहे. महाराष्ट्राची लढाई ही सेमीफायनल लढत आहे. फायनल दिल्लीमध्ये होईल. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी सर्व लिंगायत धर्मीयांनी एकत्र आले पाहिजे.

--
बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, बीदर ः सोलापूर हे हार्टप्लेस आहे. कारण सिध्दरामेश्‍वरांच्या काळात तिसरी लिंगायत परिषद ही सोलापुरात झाली, त्याचे अध्यक्ष सिध्दरामेश्‍वर हे होते. बसवेश्‍वरांच्या वचनसाहित्यांचा प्रचार  व प्रसार करण्यात सिध्दरामेश्‍वर आणि सोलापूरकरांचे मोठे योगदान आहे.
---
विजयकुमार हत्तुरे ः सोलापुरात मोर्चा काढण्याआधी प्रचंड विरोध होता. मात्र विरोधकांनी हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, हे लक्षात घ्यायला हवे. लिंगायत स्वतंत्र धर्म आहेच, त्याची स्थापना महात्मा बसवेश्‍वरांनी केली आहे. त्यामुळे मोर्चाला विरोध म्हणजे बसवेश्‍वरांच्या विचारांना विरोध केल्यासारखे आहे. त्यामुळे लिंगायत धर्मीयांनी अशा विरोधकांना न घाबरता या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.--