Wed, Sep 26, 2018 10:08



होमपेज › Solapur › लिम्का बुकात नोंदीसाठी अजब प्रस्ताव

लिम्का बुकात नोंदीसाठी अजब प्रस्ताव

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:57PM



सोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणाला कंटाळलेले काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी चक्क मनपा सभा तहकुबीच्या ‘विक्रमा’ची लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद व्हावी, असा अजब प्रस्ताव सादर केला आहे. 

सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत 102 पैकी 49 ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले. 8 मार्च 2017 ला पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतरच्या 8 मार्च 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान 23 सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आल्या. त्यापैकी तब्बल 16 सभा या कोणत्याही चर्चेविना तहकूब करण्यात आल्या. ज्या अपेक्षेने नागरिकांनी भाजपला बहुमत दिले, त्याची पूर्तता होताना दिसत नाही. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे या सभा वारंवार तहकूब झाल्याने विकासाबाबतचे अनेक विषय रेंगाळले आहेत. परिणामी, 
शहर विकासापासून वंचित आहे, असे नगरसेवक भोसले यांचे म्हणणे आहे.

सभा तहकुबीला वैतागून समस्त सोलापूरकरांच्यावतीने युवक काँग्रेसच्या माध्यमातून  सभा तहकुबीच्या अजब विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद व्हावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांनी दिला आहे. त्यांनी ई-मेल द्वारे हा प्रस्ताव लिम्का बुक ऑफ रेकार्डकडे पाठविला आहे.