Sun, Apr 21, 2019 02:17होमपेज › Solapur › लीव्हर, कॉर्निया दान करणारा ‘प्रकाश’

लीव्हर, कॉर्निया दान करणारा ‘प्रकाश’

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:26PMसोलापूर : प्रतिनिधी

रस्ता बनवणार्‍या आयआरबी कंपनीत लॅब टेक्निशियन असलेले प्रकाश भागवत हे ब्रेनडेड झाले. त्यांच्या नातलगांनी प्रकाश यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि इतरांच्या जीवनातही ‘प्रकाश’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत माणुसकी जपल्याचे जिवंत उदाहरण यशोधरा हॉस्पिटलमध्ये आज, मंगळवारी पाहावयास मिळाले.

प्रकाश भागवत हे मूळचे शहापूर, जिल्हा ठाणे येथील रहिवासी. ते आयआरबी या रोड बनवणार्‍या कंपनीत लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. या कंपनीचे सोलापुरात काम सुरू होते. यादरम्यान प्रकाश भागवत यांना मध्येच झटके येत असल्याने त्यांना यशोधरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 11 फेब्रुवारी 2018 रोजी उपचारासाठी दाखल केले. उपचारावेळी त्यांच्या मागील मेंदूतील अर्ध्या भागास रक्तपुरवठा होत नसल्याचे लक्षात आले. अशातच उपचारावेळी ते बे्रनडेड झाल्याचे 12 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता आढळून आले. पुढील 6 तासांनंतर फेरतपासणी करण्यात आली. त्यात बे्रनडेड असल्याचे पुन्हा निष्पन्न झाले. 

डॉक्टरांनी अवयवदानासाठी त्यांच्या नातेवाईकांना विचारणा केली. नातेवाईकांचा याला विरोध होता; परंतु योगायोगाने प्रकाश भागवत यांचे साडू मेघनाथ जैताकर हे जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे हेडक्लार्क आहेत. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. 

शेवटी प्रकाश यांचे अवयवदान करण्यास संमती मिळाली. परिणामी यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाने पुढील प्रकियेस सुरुवात केली आणि रूग्णाचे लिव्हर आणि कॉर्निया या अवयवांचे दान करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये या रूग्णाचे लिव्हर आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे, तर कॉर्निया श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर येथील गरजूंना देण्यात आले. 

यासाठी 12 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 6 नंतर मध्यरात्री 12 वाजता टप्प्याटप्प्याने प्रक्रिया व शस्त्रक्रिया करण्यात आली. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता हे अवयव त्या त्याठिकाणी पाठवण्यात आले.

अवयवदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी यांचे राहिले योगदान ः डॉ. बसवराज कोलूर, डॉ. जुनैद, डॉ. आशिष अंधारे, डॉ. विजय शिवपूजे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. आशिष भुतडा, डॉ. राहुल स्वामी, डॉ. शहराज बॉम्बेवाले, विजय चंद्रा, विनायक निकम, सूर्यकांत बेले, परेश मनलो, धनंजय मुळे आदी.