Thu, Jul 18, 2019 16:37होमपेज › Solapur › लाखो ‘तरुण’ बेरोजगार, तरी मध्य रेल्वेत ‘वृद्धां’ची भरती!

लाखो ‘तरुण’ बेरोजगार, तरी मध्य रेल्वेत ‘वृद्धां’ची भरती!

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:29PMसोलापूर : इरफान शेख

नोकर्‍या मिळत नसल्याने एकीकडे लाखो तरुण बेरोजगाराच्या खाईत लोटले जात असतानाच सोलापूर मध्य रेल्वे डिव्हिजनमध्ये 206 निवृत्त  वृद्ध रेल्वे कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली आहे. सोलापूर डिव्हिजनमध्ये आरपीएफ वगळता एकूण 1764 रिक्त जागा आहेत. एनआरएमयू या अधिकृत रेल्वे कर्मचारी संघटनेने वृद्ध भरतीच्या विरोधात आंदोलनदेखील केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. आरआरबी व आरआरसीकडून रेल्वे भरतीच्या जाहिराती न आल्याने हे भरती बोर्ड नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

सोलापूर मध्य रेल्वे विभाग मध्य रेल्वे झोनमध्ये येतो. याचे मुख्यालय मुंबई (सीएसटी) येथे आहे. जनरल मॅनेजर याचे मुख्य आहेत. देशभरात एकूण 17 रेल्वे झोन आहेत. मुंबई सेंट्रल झोनच्या अंतर्गत 612 स्थानके आहेत. तसेच भुसावळ, नागपूर, मुंबई (सीएसटी), सोलापूर, पुणे या शहरांत डीआरएम कार्यालय अंतर्गत मध्य रेल्वेचे कामकाज चालते. सोलापूर येथील मध्य रेल्वे डिव्हिजनमध्ये 96 स्थानके आहेत. 

या स्थानकांवर व स्थानकांना चिटकून असलेल्या रेल्वे कार्यालयात निवृत्त रेल्वे कर्मचारी कामकाज करताना दिसत आहेत. सोलापूर डिव्हिजनमध्ये सोलापूर, लातूर, दौंड, अहमदनगर, गुलबर्गा (कलबुर्गी), कुर्डुवाडी, साईनगर शिर्डी, पंढरपूर, बार्शी, वाडी जंक्शन अशी मोठी  रेल्वेस्थानके आहेत. या स्थानकांची परिस्थिती पाहिली असता व रेल्वेस्थानकांवरील सुविधा पाहिल्या असता तरुण रेल्वे कर्मचार्‍यांची गरज असल्याची जाणीव होते.

एखाद्या रेल्वेमधील निवृत्त झालेल्या कर्मचार्‍याला पुन्हा फेरनियुक्ती झाल्यास रेल्वे प्रशानाचा भरमसाठ खर्च होतो. उदा. निवृत्त झाल्यानंतर त्याला 25 ते 28 हजार रुपयांपर्यंत पेन्शनची रक्कम मिळते व तसेच फेरनियुक्ती झाल्याने शेवटी जो पगार होतो त्या पगारावर सुमारे 30 ते 60 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाते.म्हणजेच एकूणच 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत रेल्वे प्रशासनाची रक्कम त्याला दिली जाते. ही निवृत्त भरती थांबवून एखाद्या तरुणाला स्पर्धा परीक्षेतून नियुक्त केले असता 20 ते 25 हजार रुपये वेतन द्यावे लागते.रेल्वे प्रशासनाची मोठी रक्कम शिल्लक राहते.
सोलापूर रेल्वे डिव्हिजनमध्ये पर्सनल, सिग्नल आणि टेलकम्युनिकेशन, इलेक्ट्रिक, लोकोपायलट, कॅरेज अँड वॅगन, कमर्शियल, मेडिकल, ऑपरेशन असे नऊ विभाग कार्यरत आहेत. त्या नऊ विभागांतील माहिती घेतली असता प्रत्येक विभागांत निवृत्त रेल्वे कर्मचारी फेरनियुक्त झाले आहेत. रेल्वेमधून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना रेल्वे प्रशासनाकडून पेन्शन व भरमसाठ पगार मिळत असल्याने निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत. परंतु पदवीप्राप्त व पदविकाप्राप्त झालेल्या तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे. अनेकजण उच्च शिक्षण घेऊन  सरकारी नोकरी प्राप्त करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. परंतु केंद्र शासनाच्या या धोरणामुळे रेल्वेतील भरत्या जवळपास नाहीशा होत चालल्या आहेत.

दिवस-रात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या तरुणांमध्ये टोकाची अस्वस्थता आहे. घरात तरुण मुलगा नोकरीसाठी वणवण फिरतो आणि आई-बाप आपल्या मुला-मुलींना नोकरी कधी लागणार या विवंचनेत हताश होऊन  दिवस काढत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनात निवृत्तांची पुन्हा फेरनियुक्ती होत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. अनेक विभागांत निवृत्तीचे वय वाढविले जात आहे. याचे दुरगामी परिणाम सरकार व समाजात होणार आहेत, हे मात्र नक्की.कोणत्या विभागात किती कर्मचारी कधी निवृत्त होणार आहेत याचे नियोजन करुन रेल्वे भरती बोर्डाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे व लवकरात लवकर जाहिरात काढून ती जागा भरणे गरजेचे आहे. परंतु असे न करता निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना फेरनियुक्ती देण्यात येत आहे.