Wed, Jul 17, 2019 10:12होमपेज › Solapur › खिलार गायीला जर्सी गायीची गर्भधारणा 

खिलार गायीला जर्सी गायीची गर्भधारणा 

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 9:50PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथील शेतकरी शाहू लामकाने यांच्या खिलार गायीला बीबीदारफळच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जर्सी गायीची गर्भधारणा करण्याचे इंजेक्शन दिल्याने या गायीच्या पोटी अखेर जर्सी खोंड जन्माला आल्याने आश्‍चर्य निर्माण झाले आहे. याप्रकारामुळे लामकाने यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले असून यास संंबधित डॉक्टरच जबाबदार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

गायीच्या कृत्रिम रेतनासाठी लामकाने यांनी 15 ऑक्टोबर 2016 रोजी बीबीदारफळ येथील डॉक्टर चौधरी यांच्याशी संपर्क साधून इंजेक्शन देण्याची विनंती केली. या दिवशी रात्री आठ वाजता शेतात येऊन गायीला इंजेक्शन दिले. यावेळी चारशे रुपयांच्या फीवरुन दोघांत काही वेळ वादावादीही झाली होती. 

5 ऑगस्ट 2017 रोजी गायीने खिलार ऐवजी जर्सी वासराला जन्म दिला. याप्रकाराने लामकाने यांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याने त्यांनी इंजेक्शन देणार्‍या संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यावेळी माझ्याकडून चुकून इंजेक्शन बदलून दिले असल्याची कबुली त्यांनी फोनवर आपणास दिली होती, अशी माहिती लामकाने यांनी पत्रकारांना दिली. 

खासगी डॉक्टरांकडून या वासराची तपासणी केल्यानंतर वासरु जर्सी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत डॉक्टरांच्या चुकीमुळे आर्थिक नुकसान झाल्याने याविरोधात तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र या तक्रारीची कोणतीही चौकशी न करता संबंधित डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु असल्याचे लामकाने यांनी सांगितले. खिलार गाय दर अकरा ते बारा महिन्याच्या आत वासरांना जन्म देणारी गाय आहे. या गायीने जर्सी वासराला जन्म दिल्याने याचा विपरित परिणाम गायीवर झाला आहे.