Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Solapur › ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 9:02PMकरकंब : वार्ताहर

द्राक्ष परिपक्व होत असताना बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे जाण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने द्राक्ष, बोर उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण असून याचा फटका काढणीला आलेली ज्वारी, मका, आंबा यांना होत आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व करकंब परिसरात  द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष  बाजारपेठेत विकण्यापेक्षा द्राक्षापासून बेदाणा तयार करून विक्री करण्याकडे शेतकर्‍यांचा अधिक कल असतो. त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी द्राक्षे बागेत द्राक्षे तयार केली आहेत. बेदाणानिर्मितीसाठी काही शेतकर्‍यांनी द्राक्षे काढणीला सुरुवातही केली आहे. परंतु बुधवारी सकाळपासून ढगाळ  हवामान निर्माण झाले आहे. तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, तर करकंब परिसरात हलका पाऊस पडल्याने शेतकर्‍यांमध्येे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारपासून करकंब परिसरात ढगाळ वातावरण असून बुधवारी सकाळी हलक्या सरी सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. मागील दोन-तीन वर्षांपासून द्राक्ष बागा फेल गेल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही मिळाला नाही. यावर्षी पीक चांगले असूनही लहरी निसर्गामुळे आलेले पीक पदरात पडेल की नाही या चिंतेने शेतकरी ग्रासले गेले आहेत.त्याचबरोबर काढणीला आलेली ज्वारी, हरभरा, गहू , मका आदी पिकांचेही ढगाळ वातावरण व पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. सर्वाधिक फटका द्राक्षांबरोबर आंबा पिकाला बसत आहे. आंब्याचा मोहर ढगाळ वातावरणामुळे करपला जात असून गळून पडत आहे. डाळिंब पिकावर संक्रांत आल्यानंतर आता द्राक्ष पीकदेखील संकटात सापडल्याने जिल्ह्यातील फळ उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.