Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Solapur › जलयुक्तच्या कामाची चौकशी करा : दळवी  

जलयुक्तच्या कामाची चौकशी करा : दळवी  

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:56PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात झालेल्या जलयुक्तच्या कामांची चौकशी करा, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     विभागीय आयुक्त दळवी गुरूवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यांवर आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर त्यांनी हे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

राज्य शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू असून या अभियानातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. मात्र या कामात करमाळा तालुक्यात झालेल्या कामात अनियमितता असल्याची तक्रारी आहेत. यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. यावर दळवी यांनी या कामांची चौकशी करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना दिले.

अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले यांचा अहवाल प्राप्त; लवकरच शासनाला सादर करणार सीना, भीमा नदीवरील बंधार्‍यांचे बर्गे वेळेत न बसविल्यामुळे नदीतील पाणी वाहून गेले असून बर्गे बसविण्यास हलगर्जी करणार्‍या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले यांची विभागीय चौकशी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सोलापूर दौर्‍यांवर आले असताना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच तो शासनाला पाठविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील वाळूचे प्रस्ताव मान्यतेसाठी पर्यावरण विभागाकडे पाठविले असून लवकरच याला मान्यता मिळणार असून लवकरच वाळू लिलाव होणार आहे. मात्र वाळू लिलाव करताना हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवरच हे लिलाव होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 सध्या जिल्ह्यात पोलिस पाटील पदाची भरती सुरू असून 31 डिसेंबर अखेर या भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली भरती प्रक्रिया मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे आदी उपस्थित होते.