Tue, Mar 19, 2019 16:01होमपेज › Solapur › ‘अस्मितादर्श’च्या प्रेरणेने घडले सोलापुरात

‘अस्मितादर्श’च्या प्रेरणेने घडले सोलापुरात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : बाळासाहेब मागाडे

आंबेडकरोत्तर कालखंडातील आंबेडकरी साहित्याचा प्रवाह अधिक गतिमान व सक्षम करण्यामध्ये डॉ. गंगाधर पानतावणे यांचा सिंहाचा वाटा होता. या प्रवाहात सोलापुरातील असंख्य साहित्यिक घडले, लिहिते झाले. त्या सर्वांमागे डॉ. गंगाधर पानतावणे यांची प्रेरणी होती. डॉ. पानतावणे यांना अभिवादन करताना सोलापुरातील साहित्यिक, कार्यकर्ते यांनी आठवणी जागविल्या.

सोलापूरशी होते ऋणानुबंध

डॉ. गंगाधर पानतावणे यांचे सोलापूर शहर व जिल्ह्याशी चांगले ऋणानुबंध होते. औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन चळवळीचे धडे गिरविले. त्यांच्या समकालिन सहकार्‍यांपैकी ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड हे आजही सोलापुरात ही विचारधारा चेतवून ठेवताना दिसतात.

सोलापुरात 1983 मध्ये अस्मितादर्श संमेलन

सोलापूरमध्ये 12 व 13 फेब्रुवारी 1983  रोजी मुळे सभागृहात डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 वे अस्मितादर्श साहित्य संमेलन झाले होते. दया पवार हे अध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यवाह म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, योगीराज वाघमारे यांनी नेटाने भूमिका निभावली. या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक केशव मेश्राम, भालचंद्र फडके, ताराचंद्र खांडेकर, फ.मु. शिंदे, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी आदी उपस्थित होते. या संमेलनाने आंबेडकरी चळवळीचे स्फुल्लींग चेतविले.

बाबासाहेबांची पत्रकारिता केली उजागर

आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, तत्त्वज्ञ, भाष्यकार म्हणून पानतावणे यांचे कार्य उत्तुंग होते. बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वातील पत्रकारितेचा पैलू डॉ. पानतावणे यांनी उजागर केला. अस्मितादर्शमधून हजारो लेखक, कवी घडले. त्यांच्या साहित्यातून चळवळीला बळकटी मिळाली. संशोधनातून वैचारिक वारसा मिळाला.

‘सम्यक’ने दिला जीवनगौरव

सोलापुरातील सम्यक विचारमंचने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त सोलापुरात डॉ. गंगाधर पानतावणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन 2016 मध्ये सन्मानित केले होते.

विविध आंदोलनाचे प्रेरणास्थान

डॉ. गंगाधर पानतावणे हे साहित्यिक, प्राध्यापक असले तरी ते हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अनेक विद्यार्थी, संशोधक घडले. त्यांचे विद्यार्थी पुढे कार्यकर्ते, प्राध्यापक बनले. त्यांनी चळवळीत मोठे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांमध्ये सोलापुरातील विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग होता. विविध प्रश्‍नांच्या अनुषंगाने  झालेल्या आंदोलनात डॉ. पानतावणे यांच्या विचारांची प्रेरणा होती. तत्वचिंतक ते रस्त्यावरचा कार्यकर्ता असा धागा निर्माण करणारे डॉ. पानतावणे यांचे निधन झाल्याने सोलापुरातील साहित्य विश्‍व पोरके झाल्याची भावना अनेकांनी व्यक्‍त केली. 

Tags : Solapur, Solapur News, solapur inspired by asmita darshan, Babasaheb Ambedkar, Literary


  •