Sun, Mar 24, 2019 04:18होमपेज › Solapur › काँग्रेसवर संघटनात्मकदृष्ट्या पडेना ‘प्रकाश’

काँग्रेसवर संघटनात्मकदृष्ट्या पडेना ‘प्रकाश’

Published On: Aug 24 2018 10:57PM | Last Updated: Aug 24 2018 10:22PMसोलापूर : प्रशांत माने

काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश पाटील, तर शहराध्यक्षपदी विराजमान असलेले प्रकाश वाले या दोन्ही अध्यक्षांचा पक्ष संघटनेवर म्हणावा तितकासा ‘प्रकाश’ पडत नसल्याने दोघांनीही आक्रमकरित्या सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत. दोघा अध्यक्षांच्या नावात प्रकाश असल्याने काँग्रेस ‘प्रकाश’ पुन्हा झोतात येईल, ही अपेक्षा तितकिशी वास्तवात येत नसल्याचीही कुजबूज सुरु आहे.

देश व राज्यासह सोलापूर महापालिकेत वर्षानुवर्षे सत्तेेवर राहिलेल्या काँग्रेसची गेल्या पाच वर्षांत मोठी पडझड झाली आहे. मोदी लाटेत वाहून गेलेली काँग्रेस नव्या दमाने कात टाकून उभारण्याचा प्रयत्न करताना दिसून येते आहे. सोलापूर तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु मोदी लाटेत हा बालेकिल्लादेखील ढासळलेला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या एका नेत्याच्या कार्यकर्तृत्वावर सोलापुरात आजही काँग्रेस टिकून असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान असलेले प्रकाश पाटील आणि शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना संघटनात्मक पातळीसह विविध आघाड्यांवर मोठ्या जोमाने काम करावे लागणार आहे. सोलापूर महापालिकेवर जवळपास 50 वर्षांच्यावर सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला शहर काँग्रेसचीही मजबूत बांधणी करता आली नसल्याचे दिसून येते. कारण स्व. विष्णुपंत कोठे यांच्या निधनानंतर काँग्रेसला अनेक आघाड्यांवर अपयश आल्याचे चित्र आहे. 

सोलापूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. परंतु या फौजेला एकत्रित बांधण्यात काँग्रेस शहराध्यक्षांना तितकेसे यश आल्याचे दिसून येत नाही. आजही शहर काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या मोठी आहे. शिंदे यांच्या झेंड्याखाली एकत्र येणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आपसांत मात्र तितके सख्य नसल्याचे जाणवते.

केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात रान पेटविण्यात काँग्रेस अध्यक्ष अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे. विशेषता सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधील वाद प्रचंड विकोपास गेला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या सोलापूरच्या दोन्ही मंत्र्यांमधील वाद राज्यभर गाजतो आहे. सोलापूरच्या विकासाचे तीनतेरा वाजले असून सरकारने घोषणा केलेल्या उड्डाणपूल, बोरामणी विमानतळ, दुहेरी जलवाहिनी, विमानेसवा सुरु करणे आदी अनेक योजना आजही कागदावरच आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष सध्या शांतच दिसत आहेत.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील पक्षांतर्गत वाद आणि फसलेला विकासाचा गाडा या विषयावर सत्ताधार्‍यांना उघडे पाडण्याची मोठी संधी विरोधी पक्ष काँग्रेसकडे आहे. दोन्ही मंत्री देशमुखांमधील वादाचा लाभ काँग्रेसला बाजार समिती निवडणूक वगळता म्हणावा तेवढा घेता आला नाही. 

सत्ताधार्‍यांकडून सोलापूरचा विकास करवून घेण्याची विरोधक म्हणून मोठी जबाबदारी काँग्रेसवर आहे. कारण महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे धोरण नेहमीच तळ्यातमळ्यात राहिल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. महापालिकेत विरोधी पक्ष शिवसेना असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसला विरोधक म्हणून महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे.