सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका विशेष समितीच्या निवडणुकीत विरोधकांमध्ये फूट पडल्यानंतर जणू या पक्षांमध्ये कामगिरीवरून स्पर्धाच लागली आहे. शिवसेनेने शुक्रवारी औज बंधारा कोरडा पडल्याचे दाखवून दिल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरदाखल काँग्रेस, बसपने शनिवारी चिंचोळी एमआयडीसीला चक्क 24 तास पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सत्ताधारी भाजपबाबत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, बसप या विरोधी पक्षांची भूमिका प्रत्येक वेळी वेगवेगळी असल्याचे पाहावयास मिळत आहे. कधी सत्ताधार्यांना पाठिंबा, कधी विरोध असा विरोधाभास राहिला आहे. अनेकदा विरोधकांमध्ये फूट पडल्याचेही दिसून आले. स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात सर्व विरोधक एकवटले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. या पार्श्वभूमीवर विशेष समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मात्र चित्र वेगळेच दिसले. शिवसेनेने सत्ताधार्यांसमवेत ‘युती’ केली, तर अन्य पक्ष तटस्थ राहिले. यामागे मोठे राजकारण असल्याची ही बाब खरी असली तरी सध्या विरोधकांमध्ये कामगिरी व श्रेयवादाची स्पर्धा रंगल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी शिवसेनेेच्या नगरसेवकांनी विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून औज बंधारा, टाकळी व सोरेगाव येथे भेट दिली. यावेळी शिवसेनेने औज बंधारा कोरडा पडल्याचे प्रसारमाध्यमांना निदर्शनास आणून देत सत्ताधार्यांवर तोंडसुख घेतले. शिवसेनेच्या या कामगिरीनंतर काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे व बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आपापल्या पक्षांचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी शनिवारी आयुक्तांसमवेत पाकणी पंपहाऊसला भेट दिली. यादरम्यान या दोन नेत्यांनी एकीकडे शहराला चार ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना चिंचोळी एमआयडीसीला मात्र 24 तास पाणीपुरवठा होत असल्याची बाब उजेडात आणली.
--
आयुक्तांच्या सूचनेला केराची टोपली
चिंचोळी एमआयडीसीला पहाटे पाच ते अकरा यावेळेत पाणीपुरवठा न करण्याची सूचना आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या सूचनेला केराची टोपली दाखविल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकार्यांची आयुक्तांनी झाडाझडती घेतल्याची माहिती मिळत आहे. मनपाकडून दररोज एमआयडीसीचा पाणीपुरवठा नियोजित वेळेला बंद करण्यात येत असला तरी काही वेळेनंतर एमआयडीसीकडून व्हॉल्व्ह फिरवून पाणीपुरवठा अखंडित ठेवण्यात येतो, असा मुद्दाही समोर झाला आहे.
--
...तर फौजदारी करा : आयुक्त
एमआयडीसीजवळील व्हॉल्व्ह सील करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. जर हे सील एमआयडीसीने काढल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करा, असा आदेशही आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला बजाविला आहे. दरम्यान, एमआयडीसीला फक्त 12 तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नरोटे व चंदनशिवे यांनी आयुक्तांकडे केली आहे.