Tue, Apr 23, 2019 18:17होमपेज › Solapur › वाळूची चोरटी वाहतूक करणारी १३ वाहने पकडून ३२ ब्रास जप्त

वाळूची चोरटी वाहतूक करणारी १३ वाहने पकडून ३२ ब्रास जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी  शहरात  येणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे  आदेश दिल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या महिन्याभरात चोरटी वाळू वाहतूक करणारी  13 वाहने पकडून त्यामधून 32 ब्रास वाळू जप्त केली. गुन्हे शाखेने ही वाहने व वाळू महसूलकडे सोपविल्यानंतर  महसूल विभागाने सुमारे 45 लाख 50 हजारांचा दंड वसूल केला, तर गुन्हे शाखेने एका वाहनांविरुध्द थेट फौजदारी गुन्हा दाखल केला.

 गेल्या काही दिवसांपूर्वी शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये वाळूप्रकरणावरुन चांगले शीतयुध्द पेटले होते. त्यामुळे आयुक्तालयातील वाळू वसुलीचा प्रकारही उजेडात आला. त्यामुळे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी आयुक्तालयामध्ये कोणतीही व कसल्याही प्रकारची चोरटी वाळू वाहतूक होणार नाही आणि चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शहर गुन्हे शाखेला दिले होते.

पोलिस आयुक्त तांबडे यांच्या आदेशानंतर शहर गुन्ह शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी एक स्वतंत्र पथक तयार करुन शहरात चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईचा धडाका चालू केला. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूक करणार्‍यांनी त्यांचा धंदाच बंद केला होता. तरीही काही मुजोर वाळू माफियांकडून चोरटी वाळू वाहतूक केलीच जात होती. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेकडून थेट कारवाई करण्यात आली.

गेल्या एक महिन्यापासून गुन्हे शाखेकडून चोरटी वाळू वाहतूक करणारी 13 वाहने पकडण्यात आली. ती वाहने, त्यांचे क्रमांक, त्यामध्ये मिळालेली वाळू आणि वसूल केलेली दंडाची रक्कम पुढीलप्रमाणे ः हायवा टिप्पर क्र. एमएच 19 झेड 4469 (4 ब्रास वाळू, 3 लाख 68 हजार रुपये दंड), हायवा टिप्पर क्र. एमएच 24 जे 7399 (साडेतीन ब्रास वाळू, 3 लाख 47 हजार  रुपये दंड), हायवा टिप्पर क्र. एमएच 12 एचडी 1641 (अडीच  ब्रास  वाळू, 2 लाख  84 हजार रुपये दंड), मिनी ट्रक क्र. एमएच 10 एडब्ल्यू 7135 (3 ब्रास वाळू, 3 लाख 26 हजार रुपये दंड), हायवा टिप्पर क्र. एमएच 13 यू 3112 (3 ब्रास वाळू, 3 लाख 26 हजार रुपये दंड), हायवा टिप्पर एमएच 13 सीयू 0594 (पावणेतीन ब्रास वाळू, 3 लाख 1 हजार रुपये दंड), टाटा ट्रक क्र. एमएच 13 आर 3277 (3 ब्रास वाळू, 3 लाख 26 हजार रुपये दंड), टेम्पो क्र. एमएच 01 एच 6983 (2 ब्रास वाळू, 2 लाख 42 हजार रुपये दंड), टेम्पो क्र. एमएच 13 जी 1213 (1 ब्रास वाळू, 1 लाख 25 हजार रुपये दंड), महिंद्रा जीप क्र. केएल 09 के 9393 (1 ब्रास वाळू, 1 लाख 25 हजार रुपये दंड), टेम्पो क्र. एमएच 25 - 7567 (1 ब्रास वाळू, 1 लाख 32 हजार रुपये दंड), हायवा टिप्पर क्र. एमएच 13 एझेड 2702 (फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल)(4 ब्रास वाळू, 15 लाख 20 हजार रुपये दंड).


  •