Wed, Apr 24, 2019 22:00होमपेज › Solapur › ‘हुमणी’ प्रादुर्भावाने जिल्हा हादरला

‘हुमणी’ प्रादुर्भावाने जिल्हा हादरला

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:36PMसोलापूर : महेश पांढरे

सोलापूर जिल्ह्यातील ऊसशेती हुमणी रोगाच्या प्रादुर्भावाने अडचणीत आली असून जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर या तालुक्यांतील जवळपास 40 टक्के क्षेत्राला याची लागण झाल्याने जिल्ह्यातील शेेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रोगनियंत्रणासाठी हालचाली सुरू केल्या असून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. उपाययोजना व जाणीवजागृतीसाठी तातडीने दहा लक्ष रुपयांची तरतूददेखील जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण ऊस पिकावर अवंलबून आहे. मात्र, यंदा या पिकावर हुमणी नावाच्या अळीचा रोग आला असून यामुळे जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 69 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण न आल्यास ऊस उत्पादनात 40 ते 50 टक्क्यांनी घट होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता हुमणीने चांगलेच हादरून गेले आहेत. यासाठी कृषी विभागाने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाने यावर उपाययोजना आणि जाणीवजागृती करण्यासाठी जवळपास 10 लाख रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आल्याने या शेतकर्‍यांना औषधोपचारासाठी मदत व्हावी यासाठी कृषी समितीने शेतकर्‍यांना औषधे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने शेतकर्‍यांना या रोगाची माहिती व्हावी यासाठी जनजागृतीसाठी मोठी मोहीम हाती घेतली असून शेतकर्‍यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही कृषी उपसंचालक रविंद्र माने यांनी दिली आहे. दुसरीकडे या रोगामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.