Mon, Jul 22, 2019 04:40होमपेज › Solapur › गुजरातचा गड राखला; सोलापुरात जल्‍लोष

गुजरातचा गड राखला; सोलापुरात जल्‍लोष

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:14PM

बुकमार्क करा

सोलापूर : 

गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये असलेली भारतीय जनता पक्षाची सत्ता अबाधित ठेवल्याबद्दल सोमवारी सोलापुरात भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात आनंदाला उधाण आले होते. लाडू व पेढे वाटप तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. सुरूवातीला अनेक जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे भाजपची सत्ता जाईल की काय, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र मजमोजणीच्या पुढील फेर्‍यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत दुपारी 12 पर्यंत 105 ते 110 जागांवर आघाडी घेतली. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच एकंदर राजकीय गोटात तसेच सर्वसामान्यांमध्ये निवडणुकीच्या कलविषयी जोरदार चर्चा रंगली होती. टीव्ही चॅनेल तसेच मोबाईलवरुन लोक लाईव्ह अपडेट पाहात होते. भाजपचा विजय दृष्टिपथात येताच बारा वाजण्याच्या सुमारास भाजपतर्फे जल्लोषाला सुरूवात झाली. टिळक चौक येथे शहर व जिल्हा भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी केल्यावर नागरिकांना  लाडू व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.  शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्सवात महापौर शोभा बनशेट्टी, शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, युवा मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली चालुक्य, नगरसेवक नागेश वल्याळ, महिला  व बालकल्याण सभापती अश्‍विनी चव्हाण, मेनका चव्हाण, सुनील साळुंके, योगेश कांबळे, श्रीनिवास जोगी, गुरूनाथ कोळी, जिलानी सगरी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महापौर बनशेट्टी यांच्यासह अनेक महिलांनी फुगडी खेळून आनंद द्विगुणित केला. 

टिळक चौकशिवाय राजवाडे चौकातील पालकमंत्री विजयकुमार देशमख यांचे संपर्क कार्यालय, विकासनगर येथील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कार्यालय तसेच सिव्हिल चौकानजिकच्या शहर व जिल्हा भाजपचे कार्यालय अशा एकूण चार ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम झाला. एकाचवेळी थोड्याफार वेळेच्या अंतराने हे जल्लोष करण्यात आले. पालकमंत्री संपर्क कार्यालयासमोर झालेल्या जल्लोषावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, अनुजा कुलकर्णी, अंबिका पाटील, संतोष भोसले, रामेश्‍वरी बिर्रू, वरलक्ष्मी पुरूड, आनंद बिर्रू, नागेश भोगडे, अविनाश पाटील, माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे, सायण्णा गालपल्ली, सोमनाथ मेणसे, संजय कणके,  ज्ञानेश्‍वर कारभारी, राजश्री कणके, वीरेश उंबरजे, विजय कोळी, शोभा नष्टे, बिपीन धुम्मा, राजकुमार काकडे, विनोद मोटे, रवी कय्यावाले, नारायण बनसोडे, पांडुरंग दिड्डी आदी उपस्थित होते.

गुजरातच्या निकालाबद्दल राजकीय गोटांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. नोटाबंदी, जीएसटीच्या पार्श्‍वभूमीवर काही घटकांत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसणार, अशी जोरदार अटकळ बांधण्यात आली होती. मात्र ही अटकळ सोमवारी लागलेल्या निकालाने फोल ठरली.  या निवडणुकीवरुन कार्यकर्ते तसेच लोकांनी पैजाही लावल्या होत्या. भाजपच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, तर भाजप सरकारविषयी नाराजी कॅच करण्याचा काँगेसचा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमध्ये झालेल्या प्रचार सभा आदींच्या पार्श्‍वभूमीवर सार्‍या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.  भाजपने गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून निर्माण केलेला गड या निकालाने पुन्हा याच पक्षाच्या ताब्यात राहिला. निकालानंतर सोलापुरात सर्वत्र कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.