Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Solapur › कर्जपुरवठ्यात सोसायट्यांचा पत्ता कट

कर्जपुरवठ्यात सोसायट्यांचा पत्ता कट

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:36PMसोलापूर ः महेश पांढरे

राज्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार केल्यास 60 ते 70 टक्के पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते. त्यामुळे काही भागात अधिक, तर काही भागात कमी पाण्याचा पुरवठा होत असल्याने यामध्ये पाण्याचा अपव्यय वाढत चालला आहे. त्यामुळे बारमाही ऊस पिकांसाठी आता सूक्ष्म सिंचनाची साधने वापरण्याचे बंधन शासनाने केले आहे. त्यामुळे कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

राज्यातील विविध जल प्रकल्पांतील जास्तीत जास्त पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक सिंचन हे ऊस पिकांसाठी होत आहे. तर शेतकरी पारंपरिक पद्धतीने पाठाद्वारे पाणी देत असल्याने यामध्ये गरजेपेक्षा अधिक पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ऊस हे बारमाही पीक असल्याने त्यासाठी वर्षभर पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

काही तांत्रिक कारणास्तव प्रकल्पातून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात उशीर झाल्यास त्यावरील संपूर्ण ऊस शेती धोक्यात येते. याचा विचार आता शासनाने गांभीर्याने केला आहे. त्यामुळे येत्या जूनपासून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरुन पाणी घेऊन ऊस शेती करणार्‍या शेेतकर्‍यांना आता तुषार अथवा ठिंबक सिंचन वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अशा शेतकर्‍यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 7.25 टक्के व्याज दराने दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये नाबार्ड, राज्य शिखर बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने साखळी पध्दतीने कर्जपुरवठा करण्यात येणार असून यामध्ये विकास कार्यकारी सोसायट्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि शेतकरी यांच्यामध्ये करार होणार असून त्यांनतर शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 85000 रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. 20 गुंठे ते 5 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत हा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.