Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Solapur › समांतर जलवाहिनी योजनेला शासनाची मंजुरी : पालकमंत्री 

समांतर जलवाहिनी योजनेला शासनाची मंजुरी : पालकमंत्री 

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 11:01PMसोलापूर : प्रतिनिधी

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या 550 कोटींच्या योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाकडून 692 कोटींच्या योजनेचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 550 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली असून पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे, असे  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. 

शहरासाठी उजनी येथून जलवाहिनीमार्गे तसेच रोटेशननुसार नदीद्वारे औज बंधार्‍यासाठी पाणी घेतले जाते. नदीमार्गे पाणी घेण्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. शिवाय त्याचा खर्च मोठा असल्याने नदीद्वारे पाणी घेण्याची योजना बंद करून समांतर जलवाहिनी योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. याकरिता मनपाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.    समांतर जलवाहिनी योजनेसाठी मनपाकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे  एनटीपीसीची मदत घेण्यात येत आहे. एनटीपीसी महापालिकेला 250 कोटी रुपये देणार आहे. या रकमेबरोबर शासनाकडून अतिरिक्त निधी घेऊन उजनी येथून समांतर जलवाहिनी योजना राबविण्यात येणार आहे. शहराचा पाण्याचा हा प्रश्‍न मिटावा म्हणून यापूर्वी महापालिकेच्यावतीने 1240 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याला सर्वसाधारण सभेत मंजुरीही घेतली होती. मात्र तेवढा निधी देण्यास शासनाने असमर्थता दाखविल्याने मूळच्या  प्रस्तावात कपात करून 692 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. 
महापौरांनीही दिला दुजोरा

शासनाने 550 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली असून यासंदर्भात आपले मुख्यमंत्र्यांसमवेत मोबाईलवर बोलणे झाले आहे. सोमवारपर्यंत या मंजुरीबाबतचा अध्यादेश काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.