होमपेज › Solapur › रिक्षामध्ये प्रवासी बनून ५८ ग्रॅमच्या बांगड्या चोरणार्‍या महिलेस अटक

रिक्षामध्ये प्रवासी बनून ५८ ग्रॅमच्या बांगड्या चोरणार्‍या महिलेस अटक

Published On: Apr 16 2018 10:57PM | Last Updated: Apr 16 2018 10:39PMसोलापूर : प्रतिनिधी

रिक्षातून प्रवासी बनून चोरी करणार्‍या   जालना  जिल्ह्यातील  महिलेस  शहर  गुन्हे  शाखेच्या  पोलिसांनी अटक  करुन त्या महिलेकडून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

मंदाकिनी गिन्यादेव भोसले (वय 30, रा. वडिगोदरी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक  करण्यात आलेल्या महिलेचे  नाव  आहे. तर ज्योती सचदेव पवार (रा. वडिीगोदरी, ता. अंबड, जि. जालना) ही फरार आहे. याबाबत  रजनीदेवी बाबासाहेब  पाटील (वय  68, रा. जुनी पोलिस  लाईन, मुरारजी  पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

30 मार्च रोजी रजनीदेवी पाटील व त्यांची मुलगी पुष्पा देशमुख या सराफ बाजारातील अनुप ज्वेलर्स येथे जुने सोन्याचे दागिने मोडून त्याच सराफाकडे सोन्याचे चार नविन बांगड्या घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी नविन बांगड्या घेतल्यानंतर मधला मारुती येथून एक रिक्षा पकडून पांजरापोळ चौकात उतरल्या. पाटील या ज्या रिक्षामध्ये प्रवास करीत होत्या, त्या रिक्षामध्ये  त्यांच्यासोबत दोन अनोळखी महिलादेखील प्रवासी बनून मधला  मारुती चौकातून बसल्या होत्या. पांजरापोळ चौकात उतरल्याने पाटील  यांना त्या दोन्ही महिलांचा संशय आल्यााने त्यांनी पर्स उघडून पाहिली असता पर्समधील सोन्याच्या बांगड्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराफ बाजार, मधला मारुती, पांजरापोळ चौक या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी त्यांना दोन्ही संशयित महिलांचे चित्रीकरण मिळून आले. 

या दोन्ही संशयित महिला रजनीदेवी पाटील व त्यांच्या मुलीच्या मागावरच होत्या व त्यांनी ठिकठिकाणी त्यांचा पाठलागदेखील केलेला चित्रीकरणात दिसून आले. या दोन्ही संशयित महिलांचे फोटो हे इतर जिल्ह्यातील पोलिस विभागाला पाठविले. त्यावेळी या महिलेची नाव मंदाकिनी भोसले व ज्योती पवार असल्याचे दिसून आले. 

शहर  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या  दोघींचीही  माहिती काढून मंदाकिनी भोसले हिस जालना जिल्ह्यातील धोतरजोडाआष्टी येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने  आपली आत्येबहिण ज्योती पवार हिच्याबरोबर केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी मंदाकिनी भोसले हिच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 4 सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सूर्यकांत  पाटील  यांच्या   मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, हवालदार नंदराम गायकवाड, दिपक राऊत, सचिन होटकर, सागर सरतापे, सुहास अर्जुन, संजय काकडे, विजय निंबाळकर, महिला पोलिस नाईक ज्योती मोरे, आयेशा फुलारी, रमा भुजबळ, पुजा कोळेकर, शंकुतला आवळे यांनी केली.