Tue, Apr 23, 2019 18:19होमपेज › Solapur › बचत गटांना कर्ज द्या, महिला पळून जाणारे मल्ल्या नव्हेत

बचत गटांना कर्ज द्या, महिला पळून जाणारे मल्ल्या नव्हेत

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:20PMसोलापूर : प्रतिनिधी

 तब्बल एक हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या फरार होतो. बँका व सरकारही यासाठी काही करु शकले नाहीत. मात्र ग्रामीण भागातील बचत गटांना कर्जपुरवठा केल्यास त्या गटातील 9 महिलांचे कर्जभरणा करण्यासाठी दबाव असतो. त्यामुळे कर्जाची वसुली होते. बँकांनी महिला बचत गटांना तातडीने कर्जपुरवठा करावा. या महिला म्हणजे पळून जाणार्‍या विजय मल्ल्या नव्हेत, असे मत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केले. 

ग्रामविकास खाते, जि.प. ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रुक्मिणी जत्रा व राजमाता जिजाऊ आदर्श बचत गट पुरस्कार वितरण कार्यक्रम मंगळवारी सकाळी होम मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारुड यांनी बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन केले. 

यावेळी व्यासपीठावर कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, जि.प. सदस्य नितीन नकाते, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम, नाबार्ड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. भारुड म्हणाले, पूर्वी महिलांचे विश्‍व चूल व मूल यापुरतेच मर्यादित होते. आता परिस्थिती बदलत चालली आहे. घरच्या मालकाला दहा रुपये बचत गटात असणार्‍या घरातील पत्नीला मागण्याची वेळ आली आहे. 

बचत गटांमुळे महिला खर्‍याअर्थाने स्वयंपूर्ण होत आहेत. बचत गटांच्या चळवळीमुळे ग्रामीण भागातील 1 लाख 25 हजार कुटुंबे जोडली गेली आहेत. ग्रामीण भागात 12 हजार 336 बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांना 8 कोटी 90 लाखांचे खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बँकांनी बचत गटांना 76 कोटी रुपयांचे कर्जही दिल्याने या बचत गटांची उलाढाल वाढली आहे. मात्र बचत गटांसाठी तातडीने कर्जपुरवठा होत नसल्याने त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. सोलापुरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केेटिंग करण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमात बचत गटांच्या वस्तू जाणीवपूर्वक  वापरण्याची प्रथा सुरु व्हावी, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

सभापती पाटील म्हणाले, बचत गटांच्या महिलांनी जिद्द व चिकाटी कायम ठेवून प्रगती करावी. जि.प. पदाधिकारी व अधिकारी नेहमी बचत गटांां आवश्यक त्या बाबी पुरविण्यासाठी कटिबध्द आहेत. सोलापुरातील चटणी व भाकरीला बाहेर अत्यंत चांगली मागणी आहे. ज्याप्रमाणे पिझ्झा विक्रीचे व्यवस्थापन होते त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील पिझ्झा म्हणजे भाकरी व चटणीची ऑनलाईन विक्री करण्यास महिलांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

सभापती देशमुख म्हणाल्या, गरिबी व दारिद्य्र घालविण्याची ताकद महिलांत आहे. शिवरात्रीच्या मुहूर्तावर महिलांनी कुटुंबातील अंधार दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बचत गटांतील महिलांनी सर्व योजना सर्व महिलांपर्यंत पोहोचवाव्यात. उमेदमुळे महिलांना बळकटी प्राप्त झाली आहे.