Thu, Jan 17, 2019 12:43होमपेज › Solapur › सोलापूर : नाराज माने - पाटलांवर पालकमंत्र्यांनी टाकला गळ

सोलापूर : नाराज माने - पाटलांवर पालकमंत्र्यांनी टाकला गळ

Published On: Jul 18 2018 11:34AM | Last Updated: Jul 18 2018 11:34AMअकलूज : वार्ताहर

जगद्‌गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पालकमंत्री या नात्याने देशमुख यांनी या सोहळ्याचे अकलूजमध्ये जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत केले. त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख  यांनी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय फत्तेसिंह माने पाटील यांच्या घरी जाऊन चहा आणि अल्पोपहार घेतला.  सदुभाऊ चौकातील सहकार महर्षी पुतळा प्रकरणावरून  माने -पाटील हे  मोहिते पाटील यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर  माने पाटील यांच्याकडे पालकमंत्री अल्पोपहारासाठी आल्याने अकलूजकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी या अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी तालुक्यातील माने पाटील यांचे सर्व बंधू व कुटुंबीय तसेच तालुक्यातील उत्तम जाणकार, प्रकाश पाटील वगळता अन्य सर्व मोहिते पाटील विरोधक जमले होते. बंद खोलीत अल्पोपहार व चर्चा बराच वेळ सुरू होती. पालकमंत्री व माने पाटील दोघांनीही नाही म्हटले असले तरी दोघांत बऱ्याच आणा भाका झाल्याचे समजते.त्यानंतरही पालकमंत्री यांच्याच गाडीतून फत्तेसिंह माने - पाटील,पांडुरंगभाऊ देशमुख व हिंदुराव माने - पाटील पुढील कार्यक्रमाला गेले.