Sun, Jul 21, 2019 01:47होमपेज › Solapur › इंधन दरवाढीचा उच्चांक; सामान्यांचे कंबरडे मोडले

इंधन दरवाढीचा उच्चांक; सामान्यांचे कंबरडे मोडले

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:18PMसोलापूर : इरफान शेख

इंधनाच्या दरात वाढ सुरुच असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.सर्वसामान्यांच्या खिशाला याची झळ पोहोचत आहे. राज्यामध्ये पेट्रोल व डिझेलचे सर्वात जास्त व महाग दर अमरावती, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांत आहेत.

मुंबईत गुरुवारी पेट्रोलने एका लिटरसाठी 86.91 रुपये इतका दर गाठला, तर डिझेलने एका लिटरसाठी 75.96 रुपये इतका दर गाठला. दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी, तर डिझेल 21 पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 79.51 रुपये, तर डिझेलचे दर प्रति लिटर 71.55 रुपये इतके आहेत. प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला इंधन दराचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्यावर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी 6 वाजता इंधन दराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार दररोज नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात येत आहे.

 पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने महागाई  वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पेट्रोलवर 39.12 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जात आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर दिसणार आहे.

देशातील मेट्रो सिटी

देशातील चार मेट्रो शहरांत पेट्रोलच्या किंमतीने 80 रुपयांचा आकडा  पार केला आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली असून अमरावतीमध्ये  पेट्रोलने सर्वात महाग 88.06 रुपये प्रति लिटर इतका दर गाठला आहे. दिल्लीत पेट्रोल 79.51, तर डिझेल 71.55,  चेन्नईत पेट्रोल 82.62, तर डिझेल 75.61, कोलकातामध्ये पेट्रोल 82.40 रुपये, तर डिझेल 74.40 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.